
नगर : पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर काल (शुक्रवारी) झालेल्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या (India) गोलंदाजांनी पुन्हा कमाल केली. भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा व शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, के.एल. राहुलने केलेल्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पाच गडी राखून ऑस्ट्रेलियाचा (Australia) पराभव केला. ५१ धावा देत ऑस्ट्रेलियाचे पाच गडी टिपणारा मोहम्मद शमी सामनावीर ठरला.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलिया संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. मोहम्मद शमीने सलामीवीर मिचेल मार्शला (४ धावा) बाद करत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा संघ अवघ्या ४ धावांवर होता. डेव्हिड वॉर्नर व स्टिव्हन स्मिथने ९४ धावांची भागिदारी करत संघाचा डाव सावरला. ही जोडी शमीने फोडली. स्टिव्हन स्मिथ ४१ धावा करून बाद झाला. पाठोपाठ डेव्हिड वॉर्नरनेही अर्धशतक करून रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यानंतर मात्र मोठी भागिदारी झाली नाही. ५० षटकांत ऑस्ट्रेलियाचा संघ सर्व गडी गमावत २७६ धावाच जमवू शकला. भारताकडून शमीने पाच, जसप्रित बुमराह, आर अश्विन व रवींद्र जडेजाने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.
२७८ धावांचे लक्ष्य मैदानात घेऊन उतरलेल्या भारतीय संघाच्या सलामीवीरांनी भक्कम सुरुवात केली. ऋतुराज गायकवाडने ७१ व शुभमन गिलने ७४ धावा केल्या. दोघांनी १४२ धावांची भागिदारी केली. ऋतुराज बाद झाल्यावर मैदानात आलेल्या श्रेयस अय्यर (३ धावा) झटपट बाद झाला. त्यानंतर गिलही बाद झाला. त्यामुळे १५१ धावांवर भारताचे तीन फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर मात्र, के. एल. राहुलने (नाबाद ५८ धावा) सावध खेळ करत सूर्यकुमार यादवच्या (५० धावा) मदतीने संघाला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झाम्पाने सर्वाधिक दोन फलंदाज बाद केले. यजमान भारताने हा सामना जिंकत एकदिवसीय सामन्यांच्या तीन दिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात विजय मिळवत ऑस्ट्रेलियावर मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित केला आहे.