India Gate Amar Jawan Jyoti: इंडिया गेटवर ५० वर्षे अखंड प्रज्वलित असलेली ‘अमर जवान ज्‍योत’ आज विझणार…

547

गेल्या ५० वर्षांहून अधिक काळापासून इंडिया गेटवर प्रज्वलित असलेली ‘अमर जवान ज्‍योती’ (Amar Jawan Jyoti) आजपासून विझविली जाणार आहे. ही ज्योती राष्ट्रीय युद्ध स्मारक (National War Memorial) वर प्रज्वलित केली जाणार आहे. आज दुपारी ही ज्योत नॅशनल वॉर मेमोरिअल येथे नेली जाणार आहे. दुपारी ३.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

दोन्ही स्मारकांमधील अंतर हे अर्धा किमी आहे. २५ फेब्रुवारी २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे लोकार्पण केले होते. येथे 25,942 सैनिकांची नावे सुवर्णाक्षरात कोरण्यात आली आहेत. अमर जवान ज्योती इंडिया गेटच्या खाली आहे. १९२१ मध्ये इंग्रजांनी इंडिया गेट बांधले होते. पहिल्या विश्व युद्धात 84,000 सैनिकांच्या आठवणीत हे स्मारक बांधण्यात आले होते.  १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात बांगलादेश वेगळा करण्यात आला. या युद्धात अनेक वीर जवानांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते. या युद्धातील 3,843 शहीद जवानांची आठवण म्हणून इंडिया गेटखाली अमर ज्‍योती प्रज्वलित करण्याचा निर्णय झाला. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी याचे उद्धाटन केले होते. 

१९७१ च्या युद्धाला आता ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. अमर जवान ज्‍योती आता राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये हलविली जाणार आहे. राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या उभारणीपूर्वी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती, लष्करप्रमुख आणि पाहुणे प्रतिनिधी अमर जवान ज्योती येथेच शहीद जवानांना श्रद्धांजली वाहत होते. परंतु, नंतर ही संपूर्ण प्रक्रिया राष्ट्रीय युद्ध स्मारकाकडे वळवण्यात आली. असे असूनही इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती येथे मोठी गर्दी जमायची. सध्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या बांधकामामुळे हा परिसर बंद आहे. अमर जवान ज्योती राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या अमर चक्रातही आहे. इंडिया गेटवर जळणारी ज्योत यात विलीन करावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here