
INDIA : नगर : हुकूमशाही पद्धतीने विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी १४१ खासदारांचे निलंबन (Suspension of MP) करण्यात आले. त्या निषेधार्थ आज इंडिया (INDIA) आघाडीतर्फे शहरात मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भाजप (BJP) विरोधात निदर्शने करण्यात आली. भाजप हटाव, लोकशाही बचाव…देश बचावच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात इंडिया आघाडीतील भाजप विरोधी घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन आंदोलनाला प्रारंभ करण्यात आले. यावेळी आम आदमी पार्टीचे प्रा. अशोक डोंगरे, भाकपचे सुभाष लांडे, राष्ट्रवादीचे अभिषेक कळमकर, शिवसेनेचे संभाजी कदम, बन्सी सातपुते, प्रकाश फराटे, रमेश नागवडे, अर्शद शेख, ॲड. श्याम आसवा, समाजवादी पार्टीचे अजीम राजे, संजय नांगरे, फिरोज शेख, अब्दुल गनी, राजेंद्र कर्डिले, भरत खाकाळ, काकासाहेब खेसे, रवी सातपुते, अभिजीत वाघ, गंगाधर त्र्यंबके, सिद्धेश्वर कांबळे, बहिरनाथ वाकळे, बापूराव राशीनकर, चंद्रकांत माळी, संतोष गायकवाड, नगरसेवक दत्ता कावरे आदी उपस्थित हाेते.
खासदार निलंबनाच्या अतिरेकी कारवाईमधून या देशात अघोषित आणिबाणी लागू झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. लोकशाही पायदळी तुडवून हुकुमशाही पद्धतीने संसदमध्ये दडपशाहीचे दर्शन या कारवाईतून झाले आहे. नवीन संसदेत सुरक्षा भेदून काही युवक घुसले, याबद्दल केंद्रीय गृहमंत्री यांना जाब विचारणाऱ्या खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. लोकशाहीच्या मार्गाने प्रश्न विचारलेल्या खासदारांच्या प्रश्नांना उत्तर न देता त्यांच्यावर निलंबनाची वेळ आली. अशाच पद्धतीने देशभर दडपशाही सुरु असल्याचा आरोप इंडिया आघाडीच्या वतीने करुन निदर्शने करण्यात आली. उपस्थितांनी आपल्या भाषणात भाजपच्या हुकूमशाही पद्धतीने सुरु असलेल्या कारभाराचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. तर देश लोकशाही पर्वातून हुकूमशाही पर्वाकडे वाटचाल करत असल्याची उपस्थितांनी भावना व्यक्त केली.