Illegal business : अवैध धंद्यांवर कारवाई झाली नाहीतर वेगळा विचार करु : आमदार कानडे

    132

    श्रीरामपूर: पोलिसांनी तालुक्यातील अवैध धंद्यांवर (Illegal business) कारवाई केली नाही तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा सज्जड इशारा आमदार लहू कानडे यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या उपस्थितीत शांतता कमिटीच्या बैठकीत दिला. गणेश उत्सव (Ganesh Festival) व ईद-ए-मिलाद (Eid-e-Milad) च्या पार्श्वभूमीवर येथील प्रशासकीय इमारतीत शांतता समितीची बैठक पार पडली. यावेळी आमदार लहू कानडे, जिल्हा पोलीस प्रमुख (Superintendent of Police) राकेश ओला, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, पोलीस उपाधिक्षक डाॅ. बसवराज शिवपुजे, नायब तहसीलदार राजेंद्र वाघचौरे, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, हर्षवर्धन गवळी आदी उपस्थित होते.

    या बैठकीत मनोज नवले, इस्माईल शेख, नागेश सावंत, संतोष मोकळ, रियाज पठाण, सुभाष जंगले, रवी पाटील, तिलक डुंगरवाल, कुणाल करंडे, कैलास बोर्डे, बाबा शिंदे, सुभाष पटारे, अभिजीत लिप्टे, आदिक व प्रकाश चित्ते आदींनी मोकाट जनावरे, अवैध पार्किंग, विजेचा प्रश्न, वाढती गुन्हेगारी, टवाळखोरांकडून मुलींची काढली जाणारी छेड, अवैध धंदे, धार्मिक कार्यक्रमात अश्लिल नाचगाण्यांवर लक्ष ठेवावे, यांसह विविध प्रश्नांवर आपल्या सूचना मांडल्या. स्थानिक पोलीस प्रशासनाकडे केलेल्या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याने पोलीस प्रमुखासमोरच प्रश्न मांडण्याची वेळ आल्याचे प्रकाश चित्ते यांनी यावेळी सांगितले. यानंतर आमदार कानडे यांनी नागरिकांना उत्सव आनंदाने साजरे करता आले पाहिजेत, असे सांगून हरेगाव येथील मटक्याच्या टपरीवरून पोलीस प्रशासनाला धारेवर धरले. हे पोलीस प्रशासनाचे अपयश असून पूर्वीही अवैध धंद्यांबाबतचे छायाचित्रे व लेखी तक्रारी दिलेल्या आहेत. त्यावर कार्यवाही झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

    जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनी सर्वच सूचनांवर निर्णय घेऊ असे स्पष्ट करत जिल्ह्यातील ७०० ते ८०० तडीपारीचे प्रस्ताव प्रलंबित असून त्यावर लवकरच निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले. शांतता कमिटीच्या बैठकीपूर्वी जामा मशीदमध्ये मुस्लिम समाजाची बैठक पोलीस प्रमुखांनी घेतली. यावेळी मुस्लिम समाजातील काही प्रमुखांनी २८ रोजी गणेश विसर्जन मिरवणूक असल्याने ईदनिमित्त काढण्यात येणारी मिरवणूक दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता.२९) काढण्याचे आश्वासन दिल्याचे ओला यांनी बैठकीत सांगितले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here