मुंबई : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून राज्यात येत्या पाच दिवसात उष्णतेची (Heat Wave) लाट येऊ शकते , असा अंदाज वर्तवला आहे. 28, 29 आणि 30,31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी राज्यात उष्णतेची लाट येईल असा इशारा प्रादेशिक हवामान खात्यानं दिला आहे. हवामान खात्यानं दिलेला इशारा खरा ठरत असून भिवंडीत तापमान 39 डीग्रीवर पोहोचलं आहे. पुढील तीन दिवसांत पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि गुजरात राज्याकडून उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, जालना, परभणी अन्य जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट जाणवेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात येत्या 5 दिवसांत काही भागात उष्णतेची लाट जाणवेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मध्य प्रदेशचा पश्चिम भाग, विदर्भ, राजस्थान आणि दक्षिण पंजाब, दक्षिण हरियाणा, बिहार, झारखंड, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 29 ते 31 मार्चदरम्यान पुन्हा उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
जळगाव जिल्ह्यात 29 मार्च ते 31 मार्च हे तीन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने उष्माघातापासून बचाव व उपाय योजनेसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. उष्णतेच्या लाटेत उष्माघाताचा घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन पालिका प्रशासन व आरोग्य विभागास देखील सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांना देखील उष्णतेच्या लाटेत उपायोजना राबवण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने केले आहे .