
नगर : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी (Gram Panchayat Elections) उर्वरित कालावधीत म्हणजे २० ऑक्टोबर २०२३ पर्यंत अर्ज सादर करण्याची वेळ (Application submission time) दुपारी ३ ऐवजी सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे, असे राज्य निवडणूक (Elections) आयोगाकडून प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
नगर जिल्ह्यातील १९४ ग्रामपंचातीसह ८२ ठिकाणी पोट निवडणुकीसाठी पुढील महिन्यांत ५ नोव्हेंबर राेजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता अवघे दोन दिवस बाकी आहे. जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चालू महिन्यांत ३ ऑक्टोबरला राज्य निवडणूक आयोगाने घोषणा केली. घाेषणा झाल्यापासून आचारसंहिता लागू झालेली आहे.
निवडणुका होणार्या ग्रामपंचायतीच्या सदस्यपदासाठी नामनिर्देशनपत्रे भरण्यासाठी १६ ते २० ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे. दाखल नामनिर्देशनपत्रांची छानणी २३ ऑक्टोबर राेजी होणार आहे. नामनिर्देशनपत्रे २५ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येणार आहेत. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. यानंतर ५ नोव्हेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार असून मतमोजणी ६ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहे. दरम्यान, निवडणुकीची घाेषणा झाल्यापासूनच गावचे कारभारी निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. गावागावात राजकारण चांगलेच तापले आहे. कुणाचे हाल, कुणावर गुलाल हे मात्र निकालाच्या दिवशीच चित्र स्पष्ट हाेणार आहे.