Ganesh Festival : ‘तूच आहे, तुझ्या शहराचा शिल्पकार’ हा देखावा बनला गणेशाेत्सवाचा नवा ट्रेंड

    186

    नगर : गणेशोत्सव (Ganesh Festival) मंडळाच्या ठिकाणी गर्दी जमते अन्‌ सुरू होतो नाट्यविष्कार…कलाकार जिवंत देखाव्यातून आपले अभिनय कौशल्य सादर करतात अन्‌ या थेट सादरीकरणाला गणेशभक्तांची दिलखुलास दाद मिळते… दरवर्षीप्रमाणे यंदाही हौशी आणि अनुभवी कलाकारांनी सादर केलेल्या देखाव्यांचे प्रमाण वाढले आहे. शहरातील अनेक मंडळांनी पौराणिक, ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि मनोरंजनात्मक विषय हाताळले आहेत. दुसरीकडे समाजभिमुख कार्य करणाऱ्या महावीर प्रतिष्ठानने (Mahavir Pratishthan) यंदा आपलं शहर कसं असावं, आपण ठरवलं पाहिजे. हे आपण स्वत: पुढाकार घेतल्याशिवाय हे शक्य नाही, अशा आशयाचा शहराच्या विकासाला गवसणी घालणारा ‘तूच आहे, तुझ्या शहराचा शिल्पकार’ हा अनाेखा देखावा सादर करून नगरकरांना चांगलेच माेहित केले आहे. वैविध्यपूर्ण मांडणी आणि विषय असणारा हा देखावा नगरच्या गणेशोत्सवाचा नवा ट्रेंड (new trend) बनत आहेत.

    महावीर प्रतिष्ठान गणेशोत्सवात चांगला देखावा सादर करुन प्रबोधनात्मक कार्य करत आहेत. त्याचप्रमाणे अडचणीतील लोकांना मदतीचा हात देण्याचा त्यांचे उपक्रम कौतुकास्पद असेच आहे. सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे आहे. यंदा संकल्पना मंडळाने चांगल्यारितीने मांडली आहे. नगरकर हा देखावा पाहून नक्कीच आपल्या शहराच्या विकासात सहभागी होतील, असा विश्वास उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी व्यक्त केला.

    माणिक चौक येथील श्री महावीर प्रतिष्ठानच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त तूच आहे, तुझ्या शहराचा शिल्पकार’ या देखाव्याचे उद्घाटन उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते झाले. यावेळी राजेश भंडारी, अतुल शिंगवी, कमलेश भंडारी, संतोष गांधी, अमित मुथा, चेतन भंडारी, मंडळाचे अध्यक्ष श्रीपाल शिंगी, उपाध्यक्ष अमोल निस्ताने, हर्षल बोरा, प्रसाद बोरा, राकेश भंडारी, आनंद मुनोत, निखिल गांधी आदी उपस्थित होते.

    प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीपाल शिंगी म्हणाले, ”महावीर प्रतिष्ठानने नेहमीच गणेशोत्सवात सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक देखाव्यातून नगरकरांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न हाताळले आहे. मंडळाने ‘तूच आहे, तुझ्या शहराचा शिल्पकार’ हा देखावा सादर करत शहर विकासातील प्रत्येकाची भूमिका विषद केली आहे. त्याचबरोबर शहराची सद्यपरिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

    प्रतिष्ठान वर्षभर नेहमीच सामाजिक कार्यात सक्रिय असते. कोरोना काळात प्रतिष्ठानने अन्नदानसारखा उपक्रम राबवून गरजूंची सेवा केली आहे. असेच कार्य यापुढेही असेच सुरु राहील,” असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील मुनोत यांनी केले. पुष्कर तांबोळी यांनी आभार मानले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here