
नगर : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. त्यात कोकणातला गणेशोत्सव (Ganesh Festival) म्हणलं की, वेगळीच मजा असते. कारण या सणाला कोकणात (Konkan) विशेष महत्त्व असतं. कोकणवासी एकवेळ दिवाळीला गावी जाणार नाहीत मात्र गणेशोत्सवाला नक्की जातील. या गणेश भक्तांसाठीच सरकारने खूप मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतलाय.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीसह इतर सोई सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने पथकर सवलतीचा शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे कोकणवासीयांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.
कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांना शनिवार १६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत पथकर म्हणेजच टोल माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुंबई – बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत लागू असणार आहे.
या टोलमाफी सवलतीसाठी ‘गणेशोत्सव २०२३, कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टीकर्स स्वरूपाचे पास परिवहन विभाग, वाहतूक पोलिस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग यांनी समन्वय साधून उपलब्ध करून द्यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत.हाच पास परतीच्या प्रवासासाठी देखील ग्राह्य धरण्यात येईल.