EVM machine : ईव्हीएम मशिन हटवा, लाेकशाही वाचवा; बॅलेटपेपरवर निवडणुका घेण्याची विराेधकांची मागणी

    127

    EVM machine : नगर : देशातील सर्व सार्वत्रिक निवडणुका ईव्हीएम मशिन (EVM machine) ऐवजी बॅलेट पेपरवर (Ballot paper) घेण्याच्या मागणीसाठी भारत मुक्ती मोर्चा व ईव्हीएम विरोधातील समविचारी पक्षातर्फे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर (Collector’s Office) ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवाच्या घोषणा देण्यात आल्या.

    यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुभाष आल्हाट, बहुजन मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भोसले, राष्ट्रीय मूलनिवासी कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ. भास्कर रणनवरे, असंघटित कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी शेलार, संजय शिंदे, युसुफ शेख, त्रिंबक नेटके, सुरेश गायकवाड, योगी महाराज, नवनाथ गायकवाड, दत्ता वामन, रमेश गायकवाड आदी उपस्थित हाेते. 

    भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने ईव्हीएम विरोधात संपूर्ण देशातील ५६७ जिल्ह्यात राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली चार टप्प्यात आंदोलन होत आहे. या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून आज सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात ईव्हीएम विरोधात राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले आहे. १० जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, १४ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, तर ३१ जानेवारीला दिल्ली येथील केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर भव्य मोर्चाचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती सुभाष आल्हाट यांनी दिली.
     सर्वोच्च न्यायालयाने ८ ऑक्टोबर २०१३ रोजी ईव्हीएम मशिनबरोबर व्हीव्हीपॅट मशिन जोडून दोन्ही मतांची शंभर टक्के तुलना करण्याचे सूचित केले होते. परंतु, काँग्रेसचे अभिषेक सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात ईव्हीएम मशिन बरोबर व्हीव्हीपॅट मशिनचे शंभर टक्के जुळण्याऐवजी ५० टक्के जुळवण्याचे प्रकरण आणले. यामध्ये ईव्हीएम मशिन बरोबर व्हीव्हीपॅट मशिनचे चिठ्ठया १ टक्के जुळविण्याचा निर्णय देण्यात आला. निवडणुकीत केवळ १ टक्के मतांची तुलना करून निष्पक्ष, पारदर्शी निवडणूक प्रक्रिया पार पाडू शकत नसल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

    ईव्हीएम मशिनवर राजकीय पक्षांचा अविश्वास 
    ईव्हीएम मशिनवरील जनतेचा विश्‍वास संपत चालला आहे. देशातील अनेक राजकीय पक्ष सामाजिक संघटनांनी ईव्हीएम मशिनवर अविश्‍वास दाखवलेला आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्याच्या निवडणुकीत ईव्हीएम घोटाळ्यासंबंधित पंधरा ते वीस हजार तक्रारीचे प्रकरण भारतीय निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर नोंदवले आहेत. निवडणूक आयोगाने अद्यापि अनेक प्रश्‍नांची उत्तरे अजूनही दिलेली नाही. निवडणूक आयोग यासंदर्भात असंवेदनशीलता दाखवत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पारदर्शी व लोकशाही पद्धतीने निवडणुका होण्यासाठी ईव्हीएम मशिन हटवून बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना दिले. या प्रश्‍नी दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here