Diwali : दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत झुंबड

    184

    नगर : दिवाळी (Diwali) सणाच्या खरेदीसाठी गेल्या चार दिवसांपासून नगरकरांनी बाजारपेठेत (market) मोठी गर्दी केली आहे. सकाळी नऊ ते रात्री दहापर्यंंत बाजारपेठा गजबजलेल्या दिसत आहे. जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यांतील नागरिक देखील खरेदीसाठी नगरच्या बाजारपेठेला पसंती देत आहेत. कपडे, सोने-चांदी, मोबाईल, लॅपटॉप, किराणा, फटाके, पूजा साहित्य, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह इतर खरेदीसाठी कापड बाजाराला यात्रेचे स्वरूप आले आहे. पगार आणि दिवाळीचा बोनस (Diwali Bonus) हाती पडल्याने बहुतेक कुटुंब खरेदीसाठी घराबाहेर पडले आहे.

    ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाजारपेठेत अनेक व्यावसायिकांनी खरेदीवर आकर्षक डिस्काऊंट, तसेच बक्षीस ठेवले आहे. कापडबाजारासह सावेडी उपनगरात देखील ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. रंगीबिरंगी लाईट माळा, आकाश कंदील आणि सजावटीच्या साहित्याने सजलेली दुकाने ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. कापडबाजारात दुचाकी पार्क करण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने वाहनचालक मिळेल तेथे वाहने उभी करत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केल्याने व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

    दरम्यान, खास दिवाळीनिमित्त विक्रेत्यांनी वस्तू खरेदीवर ऑफर ठेवल्याने ग्राहक त्याचा लाभ घेत आहेत. बहुतांशी जण ऑनलाइन शॉपिंग करत असली, तरी प्रत्येक दुकानात जाऊन खरेदी करण्याची माैजच वेगळीच असते. त्यामुळे बाजारपेठेत गर्दी होत आहे. सरकारी कार्यालयांना शुक्रवारपासून सुट्ट्या लागल्याने खरेदीचा जोर वाढलेला दिसला. शहरातील कापड बाजार, नवी पेठ, चितळे रोड, दिल्ली गेट, माळीवाडा परिसर, मार्केट यार्ड, पाइपलाइन रोड, कायनेटिक चौक, तपोवन रोड आदी ठिकाणी ग्राहकांनी सकाळपासून आकाश कंदील, तोरण, पूजेचे साहित्य, लाईट माळा, रांगोळी आदी वस्तूंच्या खरेदीसाठी मूर्ती गर्दी केल्याची दिसते. शहरातील कल्याण रोड, सावेडी, केडगाव तसेच अनेक ठिकाणी रस्त्यांवर ठिकठिकाणी फटाक्यांचे स्टॉल लागले आहेत. फटाके खरेदीसाठी जिल्हाभरातील नागरिक शहरात येतात. बाजारात सध्या फॅन्सी आणि कमी आवाजाच्या फटाक्यांना मोठी मागणी आहे. दिवाळीत लाडू, चिवडा, करंजी, शेव, अनारसे बालूशाही आदी फराळांचे पदार्थ घरोघरी केले जातात. बहुतांशी जण मात्र हे पदार्थ रेडिमेड घेतात. त्यामुळे मिठाईच्या दुकानात फराळ घेण्यासाठी मोठी गर्दी दिसत आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here