Dhangar reservation : धनगर आरक्षणासाठी दिलेली मुदत संपली; समाज झाला आक्रमक

    118

    Dhangar reservation :नगर : धनगर आरक्षणासाठी (Dhangar reservation) मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या ५० दिवसांची मुदत संपली आहे, तरी आरक्षणाचे शासकीय पातळीवर साधं पानही हललं नाही, या विरोधात धनगर समाज बांधवांतर्फे मुख्यमंत्री (Chief Minister) यांच्या नावे अपर जिल्हाधिकारी (Additional Collector) सुहास मापारी यांना निवेदन देण्यात आले.

    निवेदनात म्हटले आहे की, धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी चौंडीसह राज्यभर विविध ठिकाणी उपोषण करण्यात आले होते. हे उपोषण स्थगित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांतर्फे ५० दिवसांत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले होते. मात्र, ५० दिवस पूर्ण होऊनही धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाहीय, ही खेदाची बाब आहे. राज्य प्रमुख म्हणून आपण मुख्यमंत्री पदी आहात. मुख्यमंत्री पदावर बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला ‘राजधर्म’ पाळावा लागतो. मुख्यमंत्री कोणत्याही विशिष्ट समुहाचे नसतात ते सर्वांचे असतात, सर्वसमावेशक असतात. एका विशिष्ट समुदायासाठी आपण खास प्रयत्न करता, धनगर आरक्षणाकडे उदासिनता दाखवता ही बाब अत्यंत खेदजनक आहे. आपण तातडीने धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा, अन्यथा धनगर समाजाच्या संविधानिक मार्गाने चालणार्‍या तीव्र लढ्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असे निवेदनात म्हटले आहे.

    याचबरोबर धनगर समाजाच्या उद्धारासाठी ८ योजनांची मागणीही करण्यात आल्या. यामध्ये धनगर समाजाच्या एस.टी.आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी. अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचतर्फे धनगर आरक्षणाकरिता उच्च न्यायालयात दाखल याचिकेत अ‍ॅड. कुंभकोणी यांची कायम नियुक्ती करुन न्यायालयात तात्काळ व दैनंदिन सुनावणी करता अर्ज दाखल करणे. मेंढपाळासाठी घोषित केलेल्या दहा हजार कोटीच्या सहकारी महामंडळाचे जिल्हास्तरीय संस्था स्थापन झाल्या आहे. लवकरात लवकर सहकार महामंडळाचे घोषणा करुन योजना कार्यान्वित करावी. धनगर समाजाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. मेंढपाळांवरील हल्ले रोखण्यासाठी स्वतंत्र कायदा करुन चराई कुरण क्षेत्र उपलब्ध करुन द्यावे. धनगर समाजाचे दैवत असलेल्या देवस्थांनाच्या सर्वांगीण विकासासाठी २०० कोटी रुपयांचा निधी द्यावा. महाराज यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले वाफगावचा विकास आराखडा तयार करावा. नगर जिल्ह्याचे ‘अहिल्यादेवीनगर’ नामांतराची अंमलबजावणी करण्याचे निर्देश द्यावेत आदी मागण्याही निवेदनाद्वारे केल्या आहेत.

    निवेदन देताना ज्येष्ठ नेते निवृत्ती दातीर, राजेंद्र तागड, काका शेळके, इंजिनिअर डी. आर. शेंडगे, भगवान जराड, अनिल ढवण, अशोक होनमाने, निशांत दातीर, बाबासाहेब तागड, ऋषी ढवण, भगवान पवार, प्रथमेश तागड आदी उपस्थित होते.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here