
Dengue Fever : शेवगाव : तालुक्यातील बालमटाकळी येथे डेंग्यूसदृश्य (Dengue Fever) आजाराने एक तरुण दगावला. तर पाच ते सहा रुग्ण खासगी रुग्णालयात (Private hospital) उपचार घेत आहेत. शेवगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश कदम व आरोग्य अधिकारी (Health Officer), आशा वर्कर, आरोग्य सेविका यांची टीम गावातील साठवलेल्या पाण्याचे नमुने घेत आहेत. तसेच साठवलेल्या पाण्यात औषध टाकून ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन करीत आहेत. दररोज सायंकाळी फॉगिंग मशीनच्या साह्याने फवारणी केली जात आहे. पडलेल्या पावसामुळे साचलेले पाण्याचे डबके यापासून होणारा डासांचा प्रादुर्भाव (Mosquito infestation) रोखण्यासाठी ग्रामस्थांनी देखील सतर्क राहून साठवलेले पाणी हे झाकून ठेवावे. तसेच पाण्यात औषध टाकून पाणी हे गाळून व उकळून पिण्यासाठी वापरावे, अशा सूचना देण्यात येत आहेत.
यावेळी सरपंच डॉ. रामजी बामदळे, उपसरपंच सर्जेराव घोरपडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथजी राजपुरे, विठ्ठल दादा देशमुख, सामाजिक कार्यकर्ते मधुकर पाटेकर, भारत घोरपडे, बंडूभाऊ शिंदे, वाल्मीक सुळे, डॉ. घुले आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
बालमटाकळी, बोधेगावसह सात गावाची असणारी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या नळाद्वारे किमान वीस ते पंचवीस दिवसांनी पिण्यासाठी पाणी मिळते. त्यामुळे साठवलेल्या पाण्यातच आपली तहान भागवण्यासाठी पाणी हे साठवून ठेवल्या जाते. त्यामुळे डेंगूसदृश व डेंगूच्या रोगाची उत्पत्ती होत असल्याने भेडसावणारा पाणी प्रश्न हे मूळ कारण आहे. साठवलेले पाणी ग्रामस्थांना गाळून का होईना पण प्यावे लागते, यावर लवकरच उपायोजना करून ग्रामस्थांना आठ दिवसाला पाणी मिळणार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे यांनी सांगितले