बीड : प्रवासी झोपेत असल्याची संधी साधत रेल्वे क्रॉसिंगवर चोरट्यांनी धुमाकूळ घालत पाच महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हातोहात लांबवले. आज परळी गंगाखेड रेल्वेमार्गावर पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.
रेल्वे क्रॉसिंगसाठी शिर्डी एक्सप्रेस थांबली होती. शिर्डी-सिकंदराबाद एक्स्प्रेसमध्ये पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घातला. परळी-परभणी मार्गावरील वडगाव स्टेशन येथे रेल्वे क्रॉसिंगच्या दरम्यान रेल्वे थांबली होती. या दरम्यान खिडकीतून हात घालत पाच महिला प्रवाशांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पलायन केले. दरम्यान गंगाखेड रेल्वे मार्गावर असलेल्या वडगाव निळा येथील रेल्वेची क्रॉसिंग असल्याने शिर्डी-सिकंदराबाद रेल्वे काही मिनिटे थांबली होती.
ही संधी साधत चोरट्यांनी खिडकीतून महिला प्रवाशांच्या गळ्यातील दागिने ओरबाडून नेले. ही माहिती औरंगाबादहून उदगीरकडे प्रवास करणारे श्रीनिवास सोनी यांनी दिली. कमलनगर (जि.बिदर) येथील एका महिलेच्या गळ्यातील 45 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र, शिर्डी-सिकंदराबाद रेल्वेतून चोरीस गेले आहे. या प्रकरणी महिलेच्या पतीने उदगीर येथील रेल्वे पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे.या फिर्यादीवरून चोरट्यांविरुद्ध परळी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..या रेल्वे मार्गावर चोरीच्या घटना घडण्याची घटना तशी काही नवीन नाही मात्र मागच्या काही दिवसापासून रेल्वे पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली होती. त्यामुळे काही अंशी अशा चोऱ्यांच्या प्रमाणाला ब्रेक सुद्धा लागला होता.
या घटनेवरून पुन्हा एकदा रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी घटनास्थळी येऊन पंचनामा करत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान घटनास्थळी रेल्वे पोलीस परळी व आरसीबीच्या अधिकारी, कर्मचार्यांनी भेट देऊन पाहणी केली




