वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा वेग मंदावत असतानच आता पुन्हा एकदा काही ठिकाणी कोरोनाने थैमान घालायला सुरुवात केली आहे.
जगभरातील अनेक देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून चीनमध्येही प्रकोप पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अशातच भारताचंही कोरोनाने टेन्शन वाढवलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून नव्या रुग्णांच्या संख्येत आणि मृतांच्या आकड्यात घट होत आहे. मात्र असं असताना पुन्हा कोरोनाची नवी लाट येणार असल्याचं म्हटलं जात आहे. यावर आता तज्ज्ञांनीच मोलाचा सल्ला दिला आहे.
एम्सचे माजी डीन आणि इम्युनोलॉजिस्ट डॉ. एनके मेहरा यांनी हाँगकाँगमध्ये लसीकरणाचे प्रमाण पुरेसे नाही. अशावेळी तिथे रुग्णसंख्या वाढून ती धोकादायक रूप धारण करण्याचे हे सर्वात मोठं कारण असू शकतं असं म्हटलं आहे.
TOI ला दिलेल्या माहितीनुसार, भारत पुढील कोरोना लाट टाळू शकतो आणि याची दोन मोठी कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे बहुतेक भारतीयांना व्हायरसची लागण झाली आहे आणि त्यांनी नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारशक्ती प्राप्त केली आहे.
दुसरे म्हणजे, कोरोनाची लस जवळजवळ सर्व प्रौढांना आणि 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांना दिली गेली आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
चीनबाबत इम्युनोलॉजिस्टने सांगितले की, तिथून मिळणाऱ्या रिपोर्ट्सनुसार रोजची प्रकरणे फारशी येत नाहीत, तरीही तेथील काही भागात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चीनमध्ये सुमारे 3 कोटी लोक त्यांच्या घरात बंद आहेत.
डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, युरोपमध्ये कोरोना प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे कारण ओमायक्रॉन व्हेरिएंट आणि त्याचा सब व्हेरिएंट आहे. पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. के. श्रीनाथ रेड्डी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
तिसर्या लाटेदरम्यान भारतातील लोकांना या प्रकाराचा सामना करावा लागला आहे. रेड्डी यांनी स्पष्टपणे सांगितले की, अशा परिस्थितीत मला कोरोनाची नवीन लाट भारतात लवकर येण्याची शक्यता दिसत नाही. मात्र असं असताना त्यांनी सावधही केले.
रेड्डी यांनी ‘लोकांनी विशेषत: सार्वजनिक ठिकाणी कोरोना नियमावलीचं पालन केलं पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी लोकांनी मास्क वापरावे आणि सोशल डिस्टंसिंग देखील पाळणं गरजेचं आहे.
दोन डोस असलेली कोरोना लस जास्तीत जास्त सहा ते आठ महिने संरक्षण देते, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत, लसीच्या उपलब्धतेनुसार, सरकारने 45 ते 60 वयोगटातील लोकांना तिसरा म्हणजे बूस्टर डोस लागू करण्याची परवानगी द्यावी. कारण या वयोगटातील लोकांना इतरही अनेक गंभीर आजार असतात.
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,568 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 97 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,15,974 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
गेल्या आठवड्यात, देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची एकूण संख्या 250 पेक्षा कमी आहे, जी 13-19 एप्रिल 2020 नंतरची सर्वात कमी आहे. तर देशात कोरोनामुळे पहिला मृत्यू 12 मार्च 2020 रोजी झाला होता. त्याच वेळी, मार्च 2020 च्या शेवटी ते वाढू लागले.
देशात कोरोनाचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. 7 ते 13 मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात, कोरोनाची 26,400 पेक्षा कमी प्रकरणे नोंदवली गेली, जी 4 ते 10 मे 2020 पेक्षा कमी आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोरोनाच्या रुग्णांमध्ये 39 टक्क्यांनी घट झाली आहे.
गेल्या आठवड्यात देशात कोरोनाचे जवळपास 43 हजार नवे रुग्ण आढळले. सध्या देशात दररोज सरासरी 3,800 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. रविवारी, कोरोनाची नवीन प्रकरणे तीन हजारांपेक्षा कमी झाली, जी 5 मे 2020 रोजी 677 दिवसांतील सर्वात कमी आहे.




