Coronavirus Update : चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. त्याशिवाय काही युरोपीय देशांमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. अशात केंद्र सरकारही सावध झालं आहे. चीनमधील वाढता कोरोनाचा कहर पाहता भारतामध्ये पुन्हा कोरोनाची लाट येणार का असा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे. यावर आरोग्य तज्ज्ञ डॉ. रवी गोडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गोडसे यांनी म्हटले आहे की, चीनमधील कोरोनाच्या लाटेचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही.
डॉ. रवी गोडसे यांनी म्हटले आहे की, ‘चीनमध्ये कोरोनाचा कहर माजला असला तरी त्याचा भारतावर काहीही परिणाम होणार नाही. चीनमध्ये सध्या जे चाललंय ते भारतात होणार नाही. कारण चीनमध्ये सध्या आलेली कोरोनाची लाटी ओमायक्रॉन संसर्गाची आहे. भारताने ओमायक्रॉनला आधीच थोपवलं आहे. डिसेंबर 2021 – जानेवारी 2022मध्ये संपूर्ण भारतात ओमायक्रॉनचा संसर्घ पसरला होता. भारतातील 80 ते 90 टक्के लोकांना ओमायक्रॉन होऊन गेला. ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्यांना पुन्हा त्याचा त्रास होत नाही. ज्यांना डेल्टा झालाय त्यांनाही परत डेल्टा होत नाही. त्यामुळे भारतावर चीनमधील कोरोना लाटेचा परिणाम होणार नाही.’
गोडसे यांनी भारतीयांनी धोका नसल्याचे दुसरे कारणही सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, ‘भारताकडे कोरोनाचा सामना करण्यासाठी दुहेरी चिलखत आहे. एक म्हणजे लसीकरण आणि दुसरं म्हणजे नैसर्गिक प्रतिकारशक्ती. चीनमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले मात्र, तेथील नागरिकांकडे साथीच्या रोगांशी सामना करण्याची नैसर्गिक प्रतिकारशक्ती नाही, जी भारतीयांकडे आहे. भारत हा जगातला एकमेव देश आहे की ज्याकडे हे दुहेरीचे संरक्षण आहे.’






