Corona Vaccine : मुलांना लस द्या, ‘तो’ पुन्हा येतोय! कोरोनाची लाट येण्याची शक्यता, वेळीच व्हा सावध

454

नाशिक : लसीकरणातील एकेक टप्पा पुढे जात आता १२ वर्षांवरील मुलांना लस देण्यासही प्रारंभ करण्यात आला आहेे. मुलांना कॉर्बेव्हॅक्स ही लस दिली जाणार असून, जिल्ह्यातील वयोगटात २ लाख २१ हजार ८४२ बालके लसीकरणासाठी पात्र आहेत. लसीचे ३७ हजार ८०० डोस जिल्ह्यासाठी प्राप्त झाले असून, त्यात मनपा क्षेत्रात एकूण २८८ लसीकरण झाले आहे. मात्र, कोरोनाची संभाव्य लाट पुन्हा येण्याची शक्यता असल्याने १२ वर्षांवरील मुलांना लस देण्याबाबत पालकांनीच पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

शहरात शुक्रवारपासून लस उपलब्ध असतानाही शहरातून दोन दिवसांपैकी पहिल्या दिवशी १९३, तर दुसऱ्या दिवशी अवघ्या ९५ बालकांचे लसीकरण झाले, तर नाशिक ग्रामीणमध्ये मात्र शनिवारपासून लसीकरणाला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्याच दिवशी १,१०७ बालकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात रविवारपर्यंत एकूण १,३९५ बालकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

राज्यात १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी महापालिकेने तयारी केलेली असताना या केंद्रांवर अपेक्षित लसीकरण होऊ शकले नाही. लसीकरणासाठी मुलांची प्रतीक्षा करण्याची वेळ आली. पंचवटीतील मेरी कोविड सेंटर, उपनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, कामटवाडे आरोग्य केंद्र, बारा बंगला प्राथमिक आरोग्य केंद्र, सातपूर ईएसआयएस हाॅस्पिटल व नाशिक रोड- बिटको या सहा केंद्रांवर किरकोळ लसीकरण झाले.

शहरातील काही केंद्रांवर अधिक मुलांचे लसीकरण झाले. त्यामुळे तिथे लसीकरणाला गेल्यानंतर पटकन लस मिळते. मात्र, आम्ही गेलेल्या केंद्रावर तब्बल एक तास थांबून किमान दहा मुलांची वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता.

एकदा डोस उघडल्यानंतर ४ तासांपेक्षा अधिक काळ ठेवता येत नसल्याने १० ते १५ मुले येईपर्यंत प्रथम आलेल्यांनाही थांबून राहावे लागते. मुलांना केंद्रात ताटकळत बसावे लागत असल्याने पालकांनादेखील मुलांसाठी थांबून राहावे लागते. हे वाट पाहणे नकोसे वाटते.

जिल्ह्यात बागलाण, कळवण, मालेगाव, नांदगाव आणि नाशिक या ५ तालुक्यांतच १२ वर्षांवरील मुलांना डोस देण्यात आले आहेत. त्यातही सर्वाधिक डोस बागलाणला ५८९, कळवणला १९८, मालेगावात १३४, नांदगावला ३९, तर नाशिक तालुक्यात १४७ मुलांना व अशाच प्रकारे नाशिक ग्रामीणला १,१०७ मुलांच्या लसीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here