Corona Vaccination: पुण्यात १५ ते १८ वयोगटातील युवकांच्या लसीकरणाला सुरुवात

493

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील लसीकरण सुरु करण्यास परवानगी दिली. देशभरात सकाळपासून लसीकरण केंद्रावर गर्दी झाली आहे. न घाबरता पालक आपल्या मुलाला लस देण्यासाठी घेऊन आले आहेत. पुण्यातही महापालिकेच्या ४० दवाखान्यांमध्ये लसीकरण सुरु झाले आहे.  

 महापालिकेच्या कमला नेहरू रूग्णालयासह प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीतील दवाखान्यांमध्ये १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत होणार आहे. या सर्वांना केवळ कोव्हॅक्सिन लस उपलब्ध करून देण्यात आली असून, ४० दवाखान्यांमध्ये प्रत्येकी २५० लसीचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये ५० टक्के लस ही ऑनलाईन नोंदणीव्दारे तर ५० टक्के लस ही लसीकरण केंद्रांवर उपस्थित असलेल्यांना ऑन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून देण्यात येणार आहे. 

सन २००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेली मुले या लसीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. केंद्राच्या कोविन पोर्टल अथवा एप्लिकेशनचा वापर नावनोंदणी करण्यासाठी करता येणार आहे. या वयोगटासाठी ५० टक्के ऑन लाईन आणि ५० टक्के ऑफ लाईन नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली असून, लसीकरणाला येताना लाभार्थ्यांकडे आधारकार्ड/ओळखपत्र आवश्यक राहणार आहे.  

महापालिका हद्दीत १५ ते १८ वयोगटातील लसीकरणासाठी पात्र मुलांची संख्या २ लाख २ हजार १०८ इतकी आहे. केंद्राच्या निर्देषानुसार शहरातील एकूण लोकसंख्येच्या ४.८ टक्के संख्या या लसीकरणासाठी पात्र धरण्यात आली आहे. तर शहरात शिक्षणासाठी असलेले अथवा ये-जा करणाऱ्यांची ५० ते १ लाखापर्यंतची संख्या अधिकची गृहित धरण्यात आली आहे. महापालिकेकडे सध्या कोव्हॅक्सिनचे ५० हजारहून अधिक डोस शिल्लक असून, केंद्र शासनाकडूनही १ जानेवारीपासून या लसीकरण मोहिमेसाठी आवश्यक कोव्हॅक्सिन लसीचा अधिकचा पुरवठा करण्यात येणार आहे़ यामुळे या वयोगटातील सर्वांना लस मिळेल अशी व्यवस्था महापालिकेने केली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here