Corona : महाराष्ट्र, दिल्लीसह पाच राज्यांना केंद्राचे पत्र; कोरोनासंदर्भात सतर्क राहण्याच्या सूचना

677

Corona : महाराष्ट्र आणि दिल्लीसह देशातील पाच राज्यांना केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाने पत्र लिहिले आहे. कोरोनासंदर्भात सतर्क राहण्याच्या सूचना या पत्रातून देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा, केरळ आणि मिझोराम या राज्यांना केंद्राने पत्र पाठवले आहे.

गेल्या आठवड्यात काही राज्यांमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्र लिहून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी गेल्या आठवड्यात दिल्ली, हरियाणा, केरळ, महाराष्ट्र आणि मिझोराम या राज्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी या राज्यांमध्ये गरज भासल्यास आधीचे काही निर्बंध लावण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशभरातील कोरोना रूग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होत आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी कोरोना काळातील निर्बंध हटवले आहेत. परंतु, देशात 1,109 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळल्यानंतर आता देशातील कोरोना रूग्णांची संख्या 4,30,33,067 वर पोहोचली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 492 वर आली आहे. कोरोनामधून बरे होण्याचा सध्याचा दर 98.76 टक्के आहे.

देशात गेल्या 24 तासांत 83 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या 83 रुग्णांपैकी 36 रूग्ण केरळमधील आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 5,21,573 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी महाराष्ट्रात 1,47,806, केरळमध्ये 68,264, कर्नाटकात 40,056, तामिळनाडूमध्ये 38,025, दिल्लीत 26,155, उत्तर प्रदेशात 23,498 आणि पश्चिम बंगालमध्ये 20,200 लोकांचा मृत्यू झाला आहे. काल दिल्लीत कोरोनाचे 176 नवीन रुग्ण आढळले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here