
कर्जत : रोजगार हमी (Employment Guarantee) योजनेतील कुशल व अकुशल कामाच्या प्रमाणात प्रशासनातील अनागोंदीमुळे मोठी तफावत आढळत आहे. तालुक्यातील वैयक्तिक लाभाच्या कामाच्या मंजुरीसाठी पैशाचा मोठा आर्थिक गैरव्यवहार (Financial malfeasance) होत असल्याचा आरोप कर्जत तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने करण्यात आला. या मागणीसाठी आज (ता.११) कर्जत तहसील कार्यालयासमोर काँग्रेसचे (Congress) तालुकाध्यक्ष किरण पाटील यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले.
कर्जत तालुक्यातील रोजगार हमी योजनांमधील कुशल व अकुशल कामाच्या प्रमाणात मोठी तफावत असून याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्यात यावी. रोजगार हमी योजनेच्या वैयक्तिक लाभाच्या कामांच्या मंजूरीसाठी लाभार्थ्याकडून पैशाचा आर्थिक गैरव्यवहार होत असून त्याची सखोल चौकशी करावी. तालुक्यात अतिशय कमी पावसाची टक्केवारी असून तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात यावा. आवश्यक ठिकाणी पाण्याचे टँकर तात्काळ सुरू करावे. यासाठी जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात. दुष्काळी परिस्थिति निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना १०० टक्के विमा लागू करीत नुकसान भरपाई देण्यात यावी. टंचाई आढावा बैठक त्वरित घेण्यात यावी, कुकडीचे सिना धरणामध्ये सोडलेले पाणी बंद केले असून ते तात्काळ पुन्हा चालू करावे. तसेच २०२२ च्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई ताबडतोब देण्यात यावी, अशा विविध मागण्यांसाठी आज काँग्रेस पक्षाच्यावतीने कर्जत तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले.
यावेळी तहसीलदार गणेश जगदाळे यांनी आंदोलनकर्त्याशी चर्चा केली. मात्र, आंदोलनकर्त्यांचे समाधान न झाल्याने उपोषण सुरूच होते. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील यांच्यासह बापूसाहेब काळदाते, तात्या ढेरे, सतीश पाटील, अशोक सूर्यवंशी, मुद्दसर शेख, किशोर तापकीर, युवराज नवसरे, मनोहर रासकर, जकी सय्यद, रामा ढोबे आदी शेतकरी सहभागी झाले होते.