
नगर : उत्तर नगरमधील कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले व राहुरी या सहा तालुक्यातील नागरिकांना आता अर्धन्यायिक सुनावणी व इतर शासकीय कामांसाठी नगरला जाण्याची आवश्यक नाही. आज (ता. १५) पासून शिर्डी (Shirdi) येथे नागरिकांच्या सेवेसाठी अपर जिल्हाधिकारी (collector) कार्यालय सुरू होत आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.
अनेक दिवसांपासून उत्तर नगर मधील नागरिकांना या कार्यालयाची प्रतीक्षा होती. आजपासून अपर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डीच्या श्री साईबाबा समाधी मंदिराच्या गेट क्रमांक २ शेजारी सुरू होत आहे. शिर्डीचे पहिले अपर जिल्हाधिकारी म्हणून बाळासाहेब कोळेकर यांनी पदभार स्वीकारला आहे.
या कार्यालयासाठी ६ पदांची निर्मिती करण्यात आली आहे. अपर जिल्हाधिकारी हे कार्यालय प्रमुख असणार आहेत. त्याशिवाय नायब तहसीलदार, लघुलेखक, अव्वल कारकून व दाेन लिपिक टंकलेखक कार्यरत असणार आहेत. अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारित शिर्डी, संगमनेर व श्रीरामपूर प्रांतधिकारी तसेच ६ तालुक्यातील तहसीलदार, ५१ मंडळाधिकारी असणार आहेत.