
भारत (Bharat) हा जगातील सर्वात श्रीमंत अर्थ व्यवस्था होईल याचा अर्थ असा तर नाही ना की, भारतातील काही निवडक उद्योगपतीच जगात श्रीमंत होतील. सर्वसमावेश विकासासाठी सरकारी योजनांचे लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचायला हवेत. मात्र, तसे आता होताना दिसत नाही. केंद्र सरकारच्या (Central Govt) जवळचे उद्योगपतीच मोठे होताना दिसत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी केंद्रातील भाजप (BJP) सरकारवर केला आहे.
नगर शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, प्रकाश पोटे आदी उपस्थित होते.
आमदार तनपुरे म्हणाले, माणूस जसा वरच्या पदावर जातो तसा त्याचा सामान्य जनतेशी संपर्क कमी झाला आहे. खुश मस्करे लोक जवळ असतात. ते नेत्यांना समाजातील भावना कळू देत नाहीत. समाजात अशी भावना आहे की, पक्ष सोडून गेलेले लोक व दुष्काळी स्थितीत स्वतःची प्रशंसा करून घेणाऱ्या नेत्यांना जनता कंटाळली आहे. राज्य सरकारवर जनता नाराज आहे. २०२४मध्ये महाविकास आघाडीचे सरकार येणार हे सर्वजण सांगत आहेत. मात्र, वरच्या पदावर गेलेल्यांना हे कळत नाही, असा टोलाही आमदार तनपुरे यांनी लगावला.