
Burglary : नगर : नगर एमआयडीसी परिसरातील बहिणीच्या घरी घरफोडी (Burglary) करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने मोठ्या शिताफीने जेरबंद केले. आरोपीकडून १६ लाख १८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. सुरज प्रकाश लोढा (वय २९, रा. सावली सोसायटी, भुषणनगर, नगर) असे जेरबंद आरोपीचे (accused) नाव आहे..
एमआयडीसी परिसरातील माताजी नगर येथे सुजय गांधी हे त्यांच्या पती सह ३० डिसेंबर २०२३ रोजी बुरुडगाव रस्ता येथे एका विवाह कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोराने अडीच लाख रुपये रोख, चार लाख ८० हजार रुपये किमतीचे २० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, तीन रुपये किमतीची तिजोरी असा सात लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या संदर्भात गांधी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करून घेतला.
या घटनेचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, नगर शहरातील सुवर्ण पेढ्या, सोने तारण देणाऱ्या कंपन्यांत माहिती घेतली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक दुचाकी वाहन गांधी यांच्या घराजवळ येत असल्याचे आढळून आले. तसेच एका फायनान्स कंपनीत चोरीला गेलेल्या वर्णनाच्या सोन्याच्या बांगड्या तारण ठेवल्याचे समोर आले. सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्ती व सोने तारण ठेवणारी व्यक्ती एकच असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. हा व्यक्ती सुजय गांधी यांचा मेहुणा सुरज लोढा असल्याची खात्री पटताच पथकाने सुरजला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
सुजय गांधी व त्यांचे कुटुंबीय विवाह सोहळ्यासाठी जाणार असल्याचे सुरजला माहिती होते. गांधी कुटुंब घराबाहेर जाताच त्याने पाळत ठेवून घराचे कुलूप तोडले. घरातील मुद्देमाल घेऊन तो निघून गेला. पथकाने त्याच्याकडून चोरी केलेले १३ लाख २६ हजार ४०० रुपये किमतीचे २२१ ग्रॅम सोन्याचे दागिने, दोन लाख चार हजार ५०० रुपये रोख, गुन्ह्याच्या वेळी वापरलेले १६ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल, ७० हजार रुपये किमतीची दुचाकी, दोन हजार रुपये किमतीची तिजोरी कापण्यासाठीचे ग्राइंडर, असा १६ लाख १८ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच चार सोन्याच्या बांगड्या एका फायनान्स कंपनीजवळ गहाण ठेवल्याचे आरोपी लोढाने पथकाला सांगितले. पथकाने पुढील तपासासाठी आरोपीला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले.





