
नगर : भारत (Bharat) आणि चीन (China) यांच्यातील सीमा संघर्ष आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे चीनच्या कुरापती बंद करण्यासाठी भारताने एक मोठं पाऊल उचललं आहे. भारताने आपली समुद्री ताकद वाढवण्याचे ठरवलं आहे. भारतीय नौदलामध्ये नवीन अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा युद्धनौका (battleship) सामील करण्यात येणार आहेत. हिंद महासागर आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशात आगामी काळातील कुरघोडींचा धोका पाहता भारतीय नौदलानं (Indian Navy) ही भूमिका घेतली आहे.
भारत आणि चीनमध्ये सीमा संघर्षासोबतच सागरी क्षेत्रातही संघर्ष सुरु आहे. दोन्ही देशांमध्ये हिंद महासागर क्षेत्रात स्पर्धा आहे. त्यामुळे भारत सध्या नौदलाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय नौदलाने ६८ युद्धनौका आणि जहाजांचा प्रस्ताव मंजूर केला आहे. तसेच त्यांची ऑर्डरही देण्यात आली आहे. नौदलामध्ये आगामी काळात २ लाख कोटी रुपये किमतीची आधुनिक जहाजे आणि युद्धनौका यांचा समावेश होईल. चीनची सागरी क्षेत्रातील कुरघोडी रोखण्यासाठी भारतीय नौदल प्रयत्नशील आहे.
केंद्राकडून नौदलाला १४३ विमाने आणि १३० हेलिकॉप्टर तसेच १३२ युद्धनौका खरेदीची परवानगीही मिळाली आहे. याशिवाय ८ लहान युद्धनौका, नऊ पाणबुड्या, पाच सर्वेक्षण जहाजे आणि दोन बहुउद्देशीय जहाजे बांधण्यास मान्यता देण्यात आली आहे. येत्या काही वर्षांत ते तयार केले जातील. २०३० पर्यंत नौदल आणखी मजबूत होऊन १५५ ते १६० युद्धनौका असतील.
२०३५ पर्यंत भारतीय नौदलाचे खरे उद्दिष्ट आपल्या ताफ्यात किमान १७५ युद्धनौका समाविष्ट करणं आहे. यामुळे हिंदी महासागरातील भारताची पोहोच आणखी मजबूत करता येईल. तसेच यासोबतच नौदलाची विमाने, लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर आणि ड्रोनची संख्या वाढवण्यावरही भर दिला जाणार आहे.