
Bhandardara Dam : नगर : भंडारदरा धरण (Bhandardara Dam), निळवंडे धरणातून पैठण धरणामध्ये प्रवरा नदीतून सांडव्याद्वारे पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रवरा नदीवरील (Pravara River) राहुरी तालुक्यातील रामपूर, केसापूर या कोल्हापूर बंधारा तर श्रीरामपूर तालुक्यातील मांडवे, गळनिंब, वळदगाव, पढेगाव, मालुंजा, भेर्डापूर, वांगी, खानापूर व कमलापूर या कोल्हापूर बंधारा परिसरात प्रतिबंधात्मक (जमावबंदी) आदेश (Restraining order) जारी करण्यात आले आहेत.
श्रीरामपूरचे उपविभागीय दंडाधिकारी किरण सावंत पाटील यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (३) अन्वये प्रतिबंधात्मक स्वरूपात ४ डिसेंबरपर्यंत जमावबंदी आदेश जारी केले आहेत. पैठण धरणामध्ये सोडलेले पाणी सुरळीतपणे जाण्यासाठी फळ्या काढण्यात येणार आहेत. नदीपात्रामध्ये पाणी सोडल्यानंतर काही ठिकाणी कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यात शेतकरी फळ्या टाकण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
जमावबंदी आदेश लागलेल्या ठिकाणांवर कोणीही गर्दी करु नये, म्हणून या ठिकाणी संचार, वाहतूक, फिरणे व या परिसरात प्रवाह कालावधीत पाच किंवा अधिक व्यक्तीस एकत्र येण्यास मनाई राहील. या कालावधीत या ठिकाणांच्या आजूबाजूस ५०० मीटरपर्यंतचे परिसरात कार्यकारी अभियंता, नगर पाटबंधारे विभाग अंतर्गत नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी व वाहने यांना वगळता कोणालाही प्रवेश करता येणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.