B S yediyurappa : कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा. राजीनामा देताना येडियुरप्पा झाले भावूक.
कर्नाटकात भाजपचा मोठा चेहरा म्हणून ओळखले जाणारे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी सोमवारी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर मोठ्या कालावधीपासून कर्नाटकात सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर पडदा पडला. राजीनामा देण्य़ापूर्वी एका कार्यक्रमात त्यांनी राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. महत्त्वाची बाब म्हणजे आजच त्यांच्या सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. कर्नाटकचे राज्यपाल थावर चंद गेहलोत यांनी येडियुरप्पा यांचा राजीनामा स्वीकारला असून पुढील मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी होत नाही तोवर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करण्यास सांगितलं आहे.
विधानसभेत यादरम्यान येडियुरप्पा हे भावूक झाले. तसंच या दोन वर्षांच्या कार्यकाळात आपली सातत्यानं परीक्षा झाली असल्याचं म्हटलं. “ज्यावेळी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते, तेव्हा मला त्यांनी केंद्रात मंत्री बनण्यास सांगितलं होतं. परंतु मी त्यांना नकार दिला आणि कर्नाटकातच राहणार असल्याचं म्हटलं होतं,” असं येडियुरप्पा म्हणाले.
“मी आपल्या राजकीय जीवनात कायमच अग्निपरीक्षा दिली आहे. जेव्हा कार नव्हत्या तेव्हा मला आठवतंय की मी दिवसभर सायकल चालवून पक्षासाठी काम करत होते. शिमोगाच्या शिकारीपुरामध्ये ठराविकच कार्यकर्त्यांसोबत मी भाजप पक्ष उभा केला. तेव्हा कोणीही नव्हतं. पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन व्हावं अशी माझी इच्छा होती, ती पूर्ण झाली,” असंही त्यांनी नमूद केलं.
यापूर्वी ट्वीटद्वारे संकेत
बुधवारी बीएस येडियुरप्पांनी ट्वीट करत आपल्या राजीनाम्याचे संकेत दिले होते. “भाजपाचा इमानदार कार्यकर्ता असल्याचा मला अभिमान आहे. मी उच्च विचारांचे अनुसरण करून पक्षाची सेवा केली हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मी माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याला आवाहन करतो की, त्यांनी पक्षाच्या आदर्शांचे पालन करावं,” असं ते म्हणाले होते.