
अकोले : ऋषी पंचमी निमित्त कोतूळ (ता.अकोले) (Akole) येथील श्री वरदविनायक (Varadvinayak) मंदिरात आज पहाटे सहा वाजता सामुदायिक अथर्वशीर्ष (Atharvashirsha) पठण भक्तीमय वातावरणात पार पडले.
श्री गणेशाची उपासना ही ऐक्य, बंधुभाव वाढवणारी व राष्ट्रीय एकात्मता व कार्यक्षमता वाढवणारी आहे, म्हणून कोतूळ येथील प्राचीन व नवसाला पावणाऱ्या श्री वरदविनायक मंदिरात जय भवानी संस्कृती संवर्धन मंडळाच्या वतीने ऋषी पंचमीनिमित्त सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करण्यात आले होते. बरोबर पहाटे सहा वाजता शंखनाद व ओंकाराच्या गजराने अथर्वशीर्ष पठणाची सुरुवात झाली. हरि ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षम्तत्वमसी त्वमेव केवलम्कर्तासी हा मंत्रउच्चार पहाटेच्या शांत वातावरणात शेकडो मुखांतून एकाचवेळी उमटला. यावेळी मंदिर परिसरातील वातावरण चैतन्यमय झाले होते.
अथर्वशीर्ष पठणाचे नेतृत्व परिमल भाटे, वेदिका परशुरामी, राशी परशुरामी यांनी केले. एका स्वरातील मंत्र पठणाने परिसरातील वातावरण भक्तीमय झाले होते. रंजना व वसंत आभाळे यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. देवस्थानच्यावतीने अध्यक्ष प्रदीप भाटे यांनी त्यांचा सन्मान केला. यावेळी डॉ. सुभाष सोमण, रमेश देशमुख, ईश्वर महाराज शास्त्री, वासुदेव साळुंके, अविनाश घाटकर, अनिल पाठक, बाळासाहेब पोखरकर, संभाजी पोखरकर, विशाल बोऱ्हाडे, दीपक राऊत, गुरुप्रसाद धुमाळ, विश्वनाथ देशमुख आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वासुदेव साळुंके, संभाजी पोखरकर, विनय समुद्र, सचिन पाटील, निवृत्ती पोखरकर, वर्षा नेवासकर, वंदना पाठक, विद्या परशुरामी, सविता घाटकर, प्रियंका पाटील, द्वारका पोखरकर, प्रियांका नेवासकर आदिंनी विशेष परिश्रम घेतले. विद्या परशुरामी यांनी पोथी वाचन केले. यावेळी हिराबाई दुटे, नंदा शेळके, अनिता पोखरकर, अनुराधा पाठक यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.






