
नगर : आशियाई स्पर्धा 2023 मध्ये (Asian Games 2023) भारताने चांगल्या सुवर्णपदकांची कमाई केली आहे. आज या स्पर्धेमध्ये महिलांच्या 10 मीटर पिस्तूल प्रकारात (Shooting 10m Air Pistol Women) भारताला सुवर्ण पदक मिळालं आहे. भारताच्या नेमबाजीमध्ये (Shooting) १७ वर्षाच्या पलक गुलियाने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. तर, ईशा सिंगने रौप्यपदक पटकावलं आहे. यापूर्वी आज सकाळीच १० मीटर एअर पिस्तूल महिलांच्या सांघिक स्पर्धेमध्ये दिव्या थडिगोल, इशा सिंग आणि पलक यांनी रौप्य पदक मिळवलं होतं. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या तिघींचं अभिनंदन केलं आहे.
आतापर्यंत भारताने मिळवलेले हे आठवं सुवर्ण पदक आहे. या स्पर्धेमध्ये भारताने आतापर्यंत 30 पदकांची कमाई केली आहे. भारताला 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजीच्या वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदकासह रौप्यपदकही मिळालं आहे. पलकने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत 242.1 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आणि सुवर्णपदकावर नाव कोरलं. तर ईशा सिंगने रौप्यपदकाची कमाई केली. यासोबतच पाकिस्तानी खेळाडूला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.
आशियाई क्रीडा स्पर्धेत ईशा सिंगने 2023 च्या भारतासाठी चार पदके जिंकली आहेत. ईशाने 10 मीटर एअर पिस्तूल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक आणि वैयक्तिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकलं. यापूर्वी हैदराबादच्या रहिवासी 18 वर्षीय ईशाने 25 मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत सुवर्ण आणि वैयक्तिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकलं होतं.