Anti Corruption Bureau : एक कोटीची लाच घेणारा सहाय्यक अभियंता गजाआड

    124

    नगर तालुका : नगर जिल्ह्यातील एमआयडीसीमधील सहाय्यक अभियंत्याला एक कोटीची लाच घेताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Corruption Bureau) पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर माहिती अशी की, नगर येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहाय्यक अभियंता यास तब्बल एक कोटीची लाच घेताना नाशिक येथील लाच प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी (ता.३) सायंकाळी रंगेहात पकडले. अमित गायकवाड (वय ३२, रा.नागापूर ) असे या सहाय्यक अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी (ता. ४) रोजी पहाटे तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ व सहाय्यक अभियंता अमित गायकवाड या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

    नगर येथील औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत ठेकेदाराने १०० एम एम व्यासाची पाईपलाईन टाकण्याचे काम केले होते. कामाच्या मंजूर निविदेनुसार ३१ कोटी ५७ लाख ११ हजार ९९५ रुपयांचे पाच टक्के प्रमाणे अनामत रक्कम एक कोटी ५७ लाख ८५ हजार ९९५ रुपये तसेच या कामाची सुरुवातीची सुरक्षा ठेव रक्कम ९४ लाख ७१ हजार ५०० रुपये झालेल्या कामाचे अंतिम देयक १४ लाख ४१ हजार ७४९ रुपये असे या कामाचे २ कोटी ६६ लाख ९९ हजार २४४ रुपये बिल होते. या बिलाची ठेकेदाराने मागणी केली. तेव्हा मागील तारखेचे बिल आउटवर्ड करून त्यावर तत्कालीन उपअभियंता गणेश वाघ यांची स्वाक्षरी घेण्यासाठी गायकवाड यांनी ठेकेदाराकडे तब्बल एक कोटीच्या लाचेची मागणी केली.

    दरम्यान, ठेकेदाराने नाशिक येथील लाच प्रतिबंधक विभागाला कळविले. ही रक्कम काल (शुक्रवारी) सायंकाळी चार वाजेच्या सुमारास नगर- छत्रपती संभाजी नगर रस्त्यावरील शेंडी बायपास येथे स्वीकारण्याचे ठरले. त्यानुसार गायकवाड हा रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत आला असता त्याला लाच स्वीकारताना नाशिक येथील पथकाने रंगेहात पकडले. त्याला ताब्यात घेऊन शासकीय विश्रामगृहात आणण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पंचनामा सुरू होता. या प्रकरणी गायकवाड यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नाशिक येथील लाच प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालवलकर यांच्या पथकाने केली.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here