Anna Hazare : राम मंदिर लोकार्पणाचे अण्णा हजारेंना निमंत्रण

    112

    पारनेर : अनेक वर्षापासून श्री राम जन्मभूमी अयोध्या (Ayodhya) येथे नियोजित असणारे राम मंदिर (Ram Mandir) व प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापना प्रतीक्षेत होती. त्या ऐतिहासिक सुवर्णक्षणाची प्रतीक्षा आता संपली असून अयोध्या येथे प्रभू रामचंद्र यांच्या भव्य मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे. प्रभु श्रीरामांच्या भव्य मुर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा मुहर्त २२ जानेवारी रोजी संपन्न होत आहे. या सोहळ्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना निमंत्रण देण्यात आले आहे. 

    अण्णा हजारेंना अयोध्येहून निमंत्रण (Anna Hazare)

    पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांनी या सोहळ्यासाठी जाण्याबाबत सकारात्मक संदेश दिला आहे. त्यामुळे या मंगलकारी सोहळ्याचे हजारे साक्षीदार होणार आहेत. नाशिक विभागातून सामाजिक कामे करणाऱ्या १० नामवंतांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. त्यात हजारे यांच्यासह पद्मश्री पोपटराव पवार यांचाही समावेश आहे. यावेळी अहमदनगरचे राष्ट्रीय स्वयं सेवकसंघाचे संघचालक डॉ.रवींद्र साताळकर व नाशिक विभागाचे संपर्क प्रमुख घनश्याम दोडिया, नगर दक्षिणचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख कैलास गाडीलकर, दत्ता आवारी, श्याम पठाडे, शिल्पा गाडीलकर आदी उपस्थित होते.

    श्री राम मंदिर न्यास ट्रस्टतर्फे निमंत्रण सुपूर्द  (Anna Hazare)

    श्री राम मंदिर न्यास ट्रस्टतर्फे श्री रामप्रभू यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे अधिकृत निमंत्रण डॉ. साताळकर व दोडिया यांच्या हस्ते हजारे यांना राळेगणसिद्धी येथे देण्यात आले. यावेळी हजारे यांनी निमंत्रण मिळाल्याबद्दल न्यासाचे आभारही मानले. प्रवास खूप लांबचा आहे. प्रकृती व्यवस्थित असेल, तर मी सोहळ्यासाठी जाईल, असेही अण्णा हजारे यांनी यावेळी सांगितले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here