Ahmednagar : अहिंसा चौक सुशोभिकरणाचे शानदार लोकार्पण

    162

    नगर तालुका : नगर (Ahmednagar) शहरातील धार्मिक परीक्षा बोर्ड पुढील इगल प्राईड जवळील चौकाचे आय लव्ह नगर फाउंडेशन व जय आनंद फाउंडेशनतर्फे काल (शनिवारी) सायंकाळी सुशोभिकरण व लोकार्पण करण्यात आले. या चौकाला ‘अहिंसा चौक’ असे नामकरण करण्यात आले आहे. मंदारबुवा रामदासी महाराज व ‘आय लव्ह नगर’चे संस्थापक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते हा कार्यक्रम दामाखात झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) हे होते.

    अहिंसा चौकात सवत्स गायीची सुंदर मूर्ती उभी करण्यात आली आहे. या मूर्तीच्या चारही बाजूंनी गोमूख कारंजा आहे. पांढऱ्या रंगाच्या या कारंज्यामुळे या रस्त्याची शोभा वाढली आहे. या कार्यक्रमाला नगरचे उपमहापौर गणेश भोसले, महापालिकेतील महिला बाल कल्याण समितीच्या उपसभापती मीना चोपडा, नगरसेवक प्रकाश भागानगरे, विपूल शेटिया, जय आनंद फाउंडेशनचे संस्थापक कमलेश भंडारी, जय आनंद फाउंडेशनचे अध्यक्ष रितेश पारख, शिल्पकार विकास कांबळे, ए.पी. सोनीमंडलेचा, प्रितेश कांकरिया, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, महिला शहर जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे आदी उपस्थित होते. 

    या प्रसंगी संग्राम जगताप म्हणाले, बुरुडगाव रस्त्यावर अहिंसा चौकामध्ये एक भव्य गायवासरू पुतळा व कारंज्याचे अनावरण करण्यात आले. हे काम आय लव्ह नगर फाउंडेशन व जय आनंद फाउंडेशनतर्फे करण्यात आले. अनेक शहरात चौकांचे खासगीकरण करण्यात येते. नगर शहरात फार कोणी असे चौक सुशोभिकरणासाठी पुढे आले नाही. मात्र, आज आय लव्ह नगर फाउंडेशनचे नरेंद्र फिरोदिया व जय आनंद फाउंडेशनचे कमलेश भंडारी यांनी पुढाकार घेतला. एक चांगला रस्ता निर्माण होत असताना चौकाचे चांगले सुशोभिकरण झाले पाहिजे, अशी संकल्पना त्यांनी मांडली. अहिंसा चौक सुशोभिकरणातून चांगले काम नगरमध्ये झाले. गोमातेच्या रक्षणाचा संदेश या चौक सुशोभिकरणातून दिला जाणार आहे. आय लव्ह नगर फाउंडेशन व जय आनंद फाउंडेशनच्या चौक सुशोभिकरण कामाचे अनुकरण सर्व संस्थांनी करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here