Ahilyanagar Crime News: मित्रचबनला वैरी ! डोक्यात दगड घातला; मृतदेह डिझेल टाकून जाळला

    241

    नगर : नारायणगव्हाण हद्दीत अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात सुपा पोलिसांना यश आले आहे. संबंधित मृतदेह हा पुण्याच्या युनूस शेख याचा असून, त्याचा मित्रानेच घात केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सुपा पोलिसांनी आरोपी प्रदीप शरणागत यास पुण्यातून ताब्यात घेतले आहे.

    या घटनेची माहिती अशी की, दि. 18 जून 2025 रोजी सकाळी 6.30 वाचे सुमारास नारायणगव्हाण शिवारातील कुकडी कॅनॉलच्या कडेला पुरुषाचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला होता.

    सुपा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासासाठी चार पथके तयार केली होती. सोलापूर ग्रामीण, सातारा, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड येथे विविध पोलिस स्टेशनला जावुन मिसिंगबाबत माहिती घेतली जात होती. फुरसुंगी पोलिस स्टेशन, पुणे शहर येथे युनूस सत्तार शेख (वय 36, श्रीराम चौक, हडपसर, पुणे/ मूळ रा. मुकुंदनगर, जि. छत्रपती संभाजीनगर) याची मिसिंग दाखल असल्याचे पुढे आले.

    सुपा येथील आढळलेला मृतदेह आणि युनूस शेख यांचे वर्णन मिळते जुळते दिसले. सहायक पोलिस निरीक्षक दिवटे यानी त्या दिशेने तपासाची चक्रे फिरवली. युनूसच्या नातेवाइकाकडे चौकशी केली असता, त्याचा मित्र प्रदीप प्रभाकर शरणागत (वय 24) याचे नाव समोर आले. त्याच्याकडे तपास केला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिले. त्यामुळे संशय बळावला. मात्र नंतर त्याने सर्व माहिती दिली.

    युनूस शेख व प्रदीप हे खूप दिवसांपासून फळविक्रीचा व्यवसाय करीत होते. त्यांचा भेकराईनगर येथे गाळा होता. मात्र दोघांमध्ये व्यवसायातून वाद झाले. यातून प्रदीपने यूनसच्या डोक्यात दगड घालून त्याला मारले व प्रेत त्याच्याच कारमध्ये घालून छत्रपती संभाजीनगरला नेण्याचे ठरवले. मृतदेह डिझेल टाकून जाळला.

    नारायणगव्हाण शिवारात त्याला सूनसान ठिकाण वाटले. त्याने कार तेथे नेऊन युनूसचा मृतदेह डिझेल टाकून जाळून टाकला व पळ काढला. कार सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावून दिली. तिची चावी प्रदीपकडेच होती. दरम्यान, युनूसच्या मिसिंगची खबर त्याच्या नातेवाइकांनी दिली. नातेवाइकांनाही प्रदीपने आपल्याला काहीही माहिती नसल्याचे दाखवले. पोलिसांनी संबंधित कारची तपासणी केली असता त्यात रक्ताचे डाग आढळले.

    नारायणगव्हाण शिवारात अनोळखी मृतदेहावर दफन संस्कार करण्यात आले होते. मात्र आता ओळख पटल्यानंतर नायब तहसीलदारासमक्ष पंचनामा करून युनूस यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला आहे. आरोपीस गुन्ह्यात अटक करून पुढील तपास करीत आहोत.

    सोमनाथ दिवटे, सहायक पोलिस निरीक्षक, सुपा

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here