Ballistic Missile Agni 4 Successfully Tested: भारताने अण्वस्त्र हल्ला करण्यास सक्षम असलेल्या अग्नी-4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, अग्नी-4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावर करण्यात आली. अग्नी-4 क्षेपणास्त्र 4,000 किमीपर्यंतच्या लक्ष्यावर मारा करू शकते. याआधी भारताने अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेल्या अग्नी-5 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. याची मारक क्षमता 5000 किमी इतकी आहे.
संध्याकाळी 7.30 च्या सुमारास ही चाचणी घेण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयाने एका संक्षिप्त निवेदनात म्हटले आहे. अग्नी-4 ची यशस्वी चाचणी भारताच्या विश्वसनीय किमान प्रतिबंधच्या धोरणाची पुष्टी करते, असे निवेदनात म्हटले आहे. मंत्रालयाने सांगितले की, चाचणीने सर्व ऑपरेशनल पॅरामीटर्स तसेच सिस्टमची विश्वासार्हता सिद्ध केली.
अलीकडेच, भारतीय नौदलाने ‘सीकिंग हेलिकॉप्टर’मधून पहिल्या स्वदेशी विकसित क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली होती. ओडिशातील बालासोर येथील एकात्मिक चाचणी श्रेणी (ITR) येथे ही चाचणी घेण्यात आली. त्यावेळी, भारतीय नौदल आणि अंदमान निकोबार कमांडने संयुक्तपणे ‘सुपरसॉनिक क्रूझ’ क्षेपणास्त्र ब्रह्मोसच्या आवृत्तीची (BrahMos supersonic cruise missile) यशस्वी चाचणी घेतली.