
नगर : नगर जिल्ह्यात यलो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आला आहे, असा इशारा भारतीय हवामान विभाग (Meteorological Department) यांनी दिला आहे. त्यामुळे विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, आपत्तीच्या सूचनांचे काटेकाेर पालन करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, तसेच महापालिका प्रशासनाने (administration) केले आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार २८ सप्टेंबरपर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस कोसळणार आहे. या कालावधीत शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. वादळी वारा, मेघगर्जनेसह विजा पडणे व जाेरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
धाेकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये, मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. महापालिकेच्या वतीने आपत्तीजनक स्थितीत नागरिकांना मंगल कार्यालय, शाळा या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पावसाळ्यात झाडाखाली उभे राहू नये, झाड, फांदी पडल्यास जीवितहानी हाेण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलिस ठाण्याशी अथवा दूरध्वनी क्र. १०७७ (टोल फ्री) वर संपर्क साधावा. तसेच शहरवासियांसाठी महापालिकेचे प्रसिद्धी प्रमुख शशिकांत नजान ९८५०१४६६११, अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ ९५६१००४६३७ या माेबाईल क्रमाकांवर नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.