
लाडकी बहीण योजनेवरून रोज नवनवीन आरोप समोर येत आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी या योजनेत तब्बल चार हजार आठशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे.
त्यांनी या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्यांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचं पडताळणीत समोर आलं आहे.नऊ हजार शासकीय कर्मचारी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला.
एक हजार दोनशे बत्तीस सेवानिवृत्त पेन्शनधारक महिलांना दहा महिने या योजनेचे पैसे मिळाले, ज्यामुळे त्यांच्या बँक खात्यांमध्ये आतापर्यंत बारा कोटी रुपये वर्ग झाले.
महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विरोधकांचे आरोप फेटाळले आहेत. माध्यमांनी किंवा विरोधकांनी कुठल्याही पद्धतीचं क्रॉस वेरिफिकेशन केलेलं नाही, असे त्यांनी म्हटले.
◼️ सुरुवातीला दोन कोटी त्रेसष्ट लाख महिलांनी योजनेचा लाभ घेतला, मात्र पडताळणीत तब्बल सव्वीस लाख लाभार्थी अपात्र ठरले. “तो सरकारचा प्रोग्राम आहे. सरकारची इन्क्वायरी झाली पाहिजे,” असे एका व्यक्तीने म्हटले आहे.
या प्रकरणात कारवाई कुणावर करणार आणि जबाबदार कोणाला धरणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे