27 वर्षीय युवकास चाकूने भोकसल्याची धक्कादायक घटना
अहमदनगर शहरातील फकीरवाडा येथील 27 वर्षीय युवकास चाकूने भोकसल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली आहे. आरोपींनी युवकाला कुर्हाड, लोखंडी रॉड, लोखंडी पाईप, लाकडी दांडके, बेल्ट आणि धारदार शस्त्राने मारहाण केली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात दहा जणांविरोधात 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात मारहाणीत जखमी झालेले अतुफ अल्लाऊद्दीन शेख (वय 27, रा. फकीरवाडा, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींमध्ये किरण पाटील, अतिश, सनी दंडवते, नितीन जाधव, आदित्य धनवडे (पूर्ण नाव माहित नाहीत) आणि इतर पाच अनोळखी इसमांचा समावेश आहे. सावेडी परिसरातील जुना बोल्हेगाव रोड परिसरात ही घटना घडली. सविस्तर असे की, सोमवारी (दि. 20) सायंकाळी साडेचारच्या दरम्यान फिर्यादी शेख हे दुचाकीवरून घरी जात होते. यावेळी त्यांच्यासमोर शेळी आल्याने त्यांनी गाडी अचानक थांबवली असता आरोपी किरण पाटील शेख यांच्यासमोर चुकीच्या बाजूने आल्याने दचकला. त्यावेळी शेख आणि आरोपी पाटील यांच्या शाब्दिक वाद झाले. शेख यांना शिवीगाळ करत धमकी दिली होती. त्यानंतर शेख ऑफिसमध्ये विसरलेला मोबाईल आणण्यासाठी गेले असता आरोपींनी शेख यांना ऑफिसमध्ये येऊन जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकूसह कुर्हाड आणि धारदार हत्यारांनी मारहाण केली. तसेच शेख यांच्या कार्यालयातील लॅपटॉप आणि कॅम्प्युटरची तोडफोड करीत नुकसान करून जीवे मारण्याची धमकी दिली.शेख यांच्या फिर्यादीवरून दहा जणांविरोधात भादंवि. कलम 307, 324, 143, 144, 147, 148, 149, 323, 504, 506, 427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास भान्सी करत आहेत.





