188 दिवसानंतर ताजमहल पर्यटकांसाठी खुला; पाळावे लागणार सर्व नियम
आग्रा: मार्च 2020 मध्ये ज्यावेळेस देशातल सुरुवातीला कोरोनाचे रुग्ण वाढत होते त्यावेळेस सरकारने देशातील मोठी मंदिरे, पर्यटन स्थळे आणि गर्दी होणारे सर्व ठिकाणं बंद केली होती. पण आता अनलॉक 4 अंतर्गत आजपासून आग्रा किल्ला आणि ताजमहल पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. सोमवारी (21 सप्टेंबर) सकाळपासूनच ताजमहल पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.
तब्बल 188 दिवसांनंतर पर्यटकांना ताज पुन्हा एकदा पाहता येणार आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे ताजमहल 17 मार्चपासून पर्यटकांना बंद करण्यात आला होता. त्यानंतर आता 21 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा पर्यटकांसाठी ताजमहल उघडण्यात आलं आहे. पण इथं येणाऱ्या पर्यटकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना पाळाव्या लागणार आहेत
घ्यावी लागणार ही काळजी-
ताजमहल पाहण्यासाठी येणाऱ्या सर्व पर्यटकांना मास्क घालणं बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर सोशल डिस्टंसिंगबद्दल विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच प्रत्येकाच्या शरीराचे तापमान तपासल्यानंतरच पर्यटकांना प्रवेश मिळणार आहे. ताजमहल पाहायला आलेल्या पर्यटकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सर्व काळजी घेण्यात आली आहे. नव्या नियमानुसार ताजमहालमध्ये 1 दिवसात फक्त 5000 पर्यटकांना प्रवेश देण्यात येणार आहे. या येणाऱ्या पर्यटकांमध्ये सोशल डिस्टंसिंग राहावं यासाठी दोन शिफ्ट देखील करण्यात आल्या आहेत.






