मुंबई : येत्या २ मार्चपासून मुंबईतील सर्व व्यवस्थापन, माध्यम आणि मंडळाच्या शाळा तसेच दिव्यांग व विशेष मुलांच्या शाळा या पूर्णवेळ आणि पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या सूचना मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने सर्व मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. तसेच सर्व शैक्षणिक उपक्रम, मैदानी खेळ आणि शाळेचे विविध कार्यक्रम शाळा राबवू शकणार आहे. या नवीन सूचनांच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद किंवा सुरु करण्याबाबत या आधीची सर्व परिपत्रके ही रद्द झाल्याचे पालिका शिक्षण विभागाकडून अधोरेखित करण्यात आले.
शुक्रवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील शाळा कोविड पूर्वपरिस्थितीप्रमाणे सुरू करण्यासाठी बैठक घेतली. त्या पार्श्वभूमीवर पलिका शिक्षण विभागाने २ मार्चपासून मुंबईतील शाळा पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचे परिपत्रक जाहीर केले. दरम्यान शाळा सुरू करताना काही नियम आणि सूचनांचे पालन करण्याच्या सूचना पलिका शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
कमी होणारी रुग्णसंख्या लक्षात घेता आवश्यक कोविड नियमांचे पालन करत शिक्षण पूर्ववत करण्याचा मानस असल्याचे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले. तसेच कोविड लसीकरणासाठी पात्र विद्यार्थ्यांकरिता निश्चित दर ठरवून पालकाच्या संमतीनुसार मुंबई महापालिका, पालिकेचा शिक्षण विभाग आणि डॉक्टरांच्या साहाय्याने शाळांच्या आवारात लसीकरण शिबिरे घेण्यास प्रोत्साहन दिले जाईल असेही आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.





