अहमदनगर 4 सप्टेंबर 2021 :- आदिवासी समाजातील एका १४ वर्षीय मुलीचा मृतदेह चितळी येथे गळफास घेतलेल्या स्थितीत एका घरात १९ ऑगस्टला आढळून आला होता. मुलीच्या घरापासून काही अंतरावरील आकाश खरात याचे हे घर होते.शवविच्छेदन अहवालानंतर मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आकाश राधू खरात या गावातील तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला गेला. आकाश हा मुलीला लग्नाची मागणी घालत होता, असे फिर्यादीत म्हटले होते.
श्रीरामपूर पोलिसांनी आकाश याला अटक केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.त्याने गुन्ह्यात सागर याचा समावेश असल्याचेही पोलिसांना सांगितले. नगर येथील जिल्हा रुग्णालयाने प्रारंभी मुलीच्या गुप्तांगावर जखमा झाल्याचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना दिला होता.
मात्र पोलिसांनी पुन्हा पत्रव्यवहार करीत स्पष्ट अहवाल देण्याची मागणी रुग्णालय प्रशासनाकडे केली होती.
त्यानंतर रुग्णालयाने मुलीवर अत्याचार झाल्याचा नव्याने अहवाल सादर केला. आरोपींमध्ये आकाश राधू खरात व सागर दत्तू पवार यांचा समावेश आहे. दोघेही गावातील रहिवासी आहेत.
आकाश याला औरंगाबाद येथून तर सागरला वैजापूर येथून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. गुन्ह्यात प्रारंभी अकस्मात, नंतर आत्महत्येस प्रवृत्त करणे व त्यानंतर गुरुवारी अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.