नाशिक/पंचवटी : बटाट्याने पन्नाशी तर कांद्यांने शंभरी गाठल्याने अनेक ठिकाणी घरगुती जेवणातून कांदा गायब झाला आहे. हॉटेलमधील मिसळ, भेळ आदींमधून कांदा गायब झाला आहे. काही व्यावसायिकांनी कांद्याला पर्याय म्हणून चक्क कोबीचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू केला आहे.
राज्यात जेवणात कांद्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. याशिवाय हॉटेल, घरगुती खाणावळी आदी ठिकाणीही कांद्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. पण परतीच्या पावसाने कांद्यासह सर्वच पिकांची वाट लावली. त्यातच अनेक ठिकाणी चाळीतला कांदाही सडून गेल्याने कांद्याचा दर सर्वसामान्य ग्राहकांच्या कक्षेबाहेर गेल्याने अनेक महिलांनी घरगुती जेवणातून कांदा हद्दपार केला आहे तर काहींनी त्याचा वापर निम्म्यावर आणला आहे. सद्या बाजारात चांगल्या दर्जाच्या एक किलो कांद्यासाठी चक्क नव्वद ते शंभऱ रूपये मोजावे लागत आहेत.
चक्क कांदा मिळणार नाहीचे फलक
नाशिक शहर अन झणझणीत मिसळ आणि भेळभत्ता हे जुने समिकरण. मात्र सद्या कांद्याच्या वाढत्या दरामुळे अनेक भेळभत्ता विक्रेत्यांनी कांद्याऐवजी चक्क कोबीचा वापर सुरू केला आहे. भेळभत्ता पार्सल घेतलेतरी त्यासोबत कांदा दिला जात असे. आता मात्र उच्चांकी दरामुळे कांदा मिळणार नाही, असा
ग्राहक तुटायला नको….
कांद्याच्या दराने शंभरी गाठल्याने अनेक ठिकाणी नाष्टा अन जेवणातून कांदा गायब झाला आहे. मात्र या परिस्थितीतही आपल्या हॉटेलचे नाव टिकवून ठेवण्याच्या धडपडीत अनेक व्यावसायिक ग्राहकांना खूष ठेवण्यासाठी मागेल तेवढा कांदा देतात. शहरातील मिसळ खवैय्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याने गेल्या काही दिवसांपासून शहराच्या परिसरात मिसळ खाण्याची ठिकाणे नव्याने सुरू झाली आहेत. अशा ठिकाणी सकाळपासून उशीरापर्यत मिसळ उपलब्ध असते. ग्राहकांची नाराजी नको म्हणून बहुसंख्य विक्रेते ग्राहक मागतील तेवढा कांदा देतात. यासाठी नफ्यात घट झाली तरी चालेल पण ग्राहक तुटायला नको, अशी भुमिका मखमलाबाद परिससरातील एका प्रसिद्ध मिसळ व्यावसायिकाने दिली.




