हेराफेरी! 199 रुपयांचं पेट्रोल भरायला सांगितलं पण ‘त्याने’ 730ml कमीच भरलं, ग्राहकाने घडवली अद्दल

521

नवी दिल्ली – वाढत्या इंधन दरांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. काही ठिकाणी पंपांवर पेट्रोल भरताना हेराफेरी केली जाते. ग्राहकांची फसवणूक होत असल्याचं दिसून येतं. राजस्थानमध्ये अशीच एक घटना घडली आहे. ग्राहकाने सांगितलेल्या रकमेच्या तुलनेत कमी पेट्रोल भरून ग्राहकाची फसवणूक केल्यामुळे एका पेट्रोल पंपावर कारवाई करण्यात आली आहे. राजस्थानमधल्या चुरू येथील एक ग्राहक बाईकमध्ये 199 रुपयांचं पेट्रोल टाकण्यासाठी गेला होता. परंतु, त्याला कमी पेट्रोल भरलं गेल्याची शंका आली. त्याने बाईकची टाकी तपासली असता, पेट्रोल कमी असल्याचं निदर्शनास आलं. 

ग्राहकाने इंडियन ऑईल कंपनीचे वितरण अधिकारी, जिल्हा पुरवठा विभागाचे निरीक्षक संपत गुर्जर आणि कृष्ण कुमार यांच्याकडे तक्रार केली. या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जात तपास केला आणि नंतर पंप सील करण्यात आला. हे प्रकरण मिटवण्यासाठी पेट्रोल पंप चालकाने प्रयत्न केले. मात्र, तरुणाने याबाबतची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. हे प्रकरण जिल्हाधिकारी सिद्धार्थ सिहाग यांच्यापर्यंत पोहोचलं असता त्यांनी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना तपासणीसाठी पाठवलं. 

तपासादरम्यान, पेट्रोलपंप चालकाची हेराफेरी स्पष्ट झाली. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पेट्रोल पंप सील करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, आसिफ खां नावाचा ग्राहक जिल्हाधिकारी कार्यालयानजीकच्या नोलीराम अँड सन्स या पंपावर गेला. तिथे त्याने 199 रुपयांचं पेट्रोल बाईकमध्ये भरलं. हे पेट्रोल 1.82 लीटर असायला हवं होतं. पण पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी कमी पेट्रोल भरलं. पेट्रोलचं मोजमाप केलं असता, 730ML पेट्रोल कमी असल्याचं दिसून आलं. पेट्रोल टाकल्यानंतर या ग्राहकाला संशय आल्याने त्याने बाईकच्या टाकीतलं पेट्रोल एका बाटलीत भरलं. त्यावेळी पेट्रोल कमी असल्याचं लक्षात आलं. 

बाईकमध्ये पूर्वीचं पेट्रोल असूनही या पेट्रोलचं प्रमाण कमी असल्याचं स्पष्ट झालं. याबाबत तक्रार केली असता, पेट्रोल पंप चालकाने पहिल्यांदा प्रकरण मिटवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, नंतर त्याने चूक कबूल केली. याबाबत डीएसओ सुरेंद्र महला यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘इंडियन ऑईल कंपनीचे चार नोजल सील करण्यात आले आहेत’. या कारवाईवेळी इंडियन ऑईल कंपनीचे वितरण अधिकारी कुमार सौरभ, जिल्हा पुरवठा निरीक्षक संपत गुर्जर आणि कृष्ण कुमार आदी उपस्थित होते. आज तकने याबाबतचे वृत्त दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here