दिल्ली – कर्नाटक उच्च न्यायालयाच्या (Karnataka High court) मोठा निर्णय देत कर्नाटकाच्या शाळे आणि कॉलेजमध्ये हिजाबवर बंदी कायम ठेवली आहे. यामुळे आता या निर्णयाविरोधात मूळ याचिकाकर्त्या विद्यार्थिनींनीही सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे.
याआधी निबा नाज या मुस्लिम विद्यार्थ्याच्या वतीने देखील सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. हिजाबबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या 6 मूळ याचिकाकर्त्यांमध्ये निबा नाझचा समावेश नाही. मात्र आता कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वांनीच आव्हान दिले आहे.
विद्यार्थिनींच्या वतीने वकिल संजय हेगडे आणि देवदत्त कामत यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे लवकर सुनावणीची मागणी केली, परंतु सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी होळीच्या सुट्टीनंतर केली जाईल, असे सांगितले. सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांनी सांगितले की, होळीच्या सुट्ट्यांनंतर हे प्रकरण सुनावणीसाठी येईल. तथापि, सोमवार, 21 मार्च रोजी झालेल्या सुनावणीस सीजेआयने असहमती दर्शविली. होळीच्या सुटीनंतर 21 मार्चलाच कोर्ट सुरू होईल.
वकिल संजय होगाडे यांनी या खटल्याची सुनावणी लवकर होणे गरजेचे असल्याचे सांगून न्यायालयाला विनंती केली होती की, आता परीक्षा होणार असून त्यात विद्यार्थिनींना परीक्षा द्यावी लागेल, अशा परिस्थितीत सोमवारीच सुनावणी व्हावी.
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या पूर्ण खंडपीठाने मंगळवारी (15 मार्च) निकाल देताना सांगितले की, हिजाब घालणे ही इस्लामची अनिवार्य धार्मिक प्रथा नाही. यासोबतच न्यायालयाने हिजाबवरील बंदी कायम ठेवली होती.