नागपूर, दि. 14 : भारतीय स्वातंत्र्याचा 74 वा वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. उद्या आयुक्त कार्यालयातील शासकीय कार्यक्रमात ते झेंडावंदन करणार आहेत. यावेळी ते जिल्ह्याला संबोधित करणार आहेत.
“आपल्या देशात शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यात आपण प्रयत्नशील राहू, आपले स्वातंत्र्य सहज मिळालेले नाही. संघर्ष करुन आपण ते साध्य केले आहे. कोरोना काळात स्वातंत्र्य दिन साजरा करताना कोविड सुरक्षा नियमांचे पालन करा. हात धुवा, मास्क लावा व अंतर पाळा. एक जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य निभावूया. स्वातंत्र्य व राष्ट्राची मूल्य ठिकवून ठेवण्याची शपथ आपण घेवूया.” या शब्दांत पालकमंत्री श्री.राऊत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय समारंभ विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात आयोजित करण्यात आला आहे. उद्या रविवार, दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजता पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते मुख्य सोहळ्यात ध्वजारोहण होईल. त्यानंतर ते सशस्त्र पोलीस दलाची मानवंदना स्विकारतील.
या कार्यक्रमाला निमंत्रित उपस्थितांनी कोविड सुरक्षा उपायांचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.