स्तनपानाचे महत्त्व समाजात अधिकाधिक रूजवा : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

467


औरंगाबाद, दिनांक 07 (जिमाका) : नवजात बालकांना स्तनपान अत्यंत आवश्यक आहे. त्यानुसार स्तनपानाचे महत्तव समाजात अधिकाधिक रूजविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.
घाटीतील मेडिसिन विभागाच्या सभागृहात जागतिक स्तनपान सप्ताहाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, स्त्रीरोग व प्रसुती विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा, बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. प्रभा खरे, युनिसेफचे कन्स्लटंट डॉ. पांडुरंग सुदामे, बालरोग तज्ज्ञ डॉ. एल. एस. देशमुख आदींसह घाटीतील वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स, विद्यार्थी आदींची उपस्थिती होती.
श्री. चव्हाण यांनी स्तनपानाचे महत्तव सांगितले. आईचे दूध बालकांशी घट्ट नाते निर्माण करते. आईचे मानसिक संतुलन राखते, शिवाय बालकांना संभाव्य आजारापासूनही दूर ठेवते. त्यामुळे नवजात शिशुला वेळीच स्तनपान करण्याचा सल्ला डॉक्टरांनी द्यावा, असेही ते म्हणाले. त्याचबरोबर कोविड काळात घाटीने अतिशय उत्तमरित्या काम केल्याचे सांगत घाटी प्रशासनाचे कौतुक केले. घाटीतील वैद्यकीय सुविधा सीएसआर निधीतून वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे उद्योग, उद्योजकांचेही त्यांनी आभार मानले.
डॉ. येळीकर यांनी स्तनपान करण्याचे शास्त्रीय महत्तव आणि संशोधनाबाबत माहिती दिली. स्तनपानाचे वैशिष्ट्ये सांगितली. स्तनपान अमृतपान असल्याचे सांगत स्तनपान केल्यामुळे नवजात शिशु सशक्त, चाणाक्ष होतो, म्हणून प्रत्येक मातेने शिशुस जन्म दिल्यानंतर त्यास लगेच स्तनपान करावे, असे आवाहन केले. यावेळी युनिसेफच्या डॉ.सुदामे यांनी चित्रफितीद्वारे स्तनपानाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here