रियाध :
सौदी अरेबियाने पाकिस्तानला जबरदस्त झटका दिला आहे. पुढील महिन्यात होऊ घातलेल्या ‘जी-20 समिट’साठी सौदीने विशेष परिपत्रक जारी केले आहे. परिपत्रकाच्या मागील बाजूला ‘जी-20’ सदस्य देशांचे नकाशे आहेत. अर्थात, यात पाकिस्तानचाही नकाशा आहे आणि पाकच्या या नकाशात पाकव्याप्त काश्मीर तसेच गिलगिट आणि बाल्टिस्तान हे भाग दाखविण्यात आलेले नाहीत.
पाकिस्तान या प्रकाराने सुन्न झालेला असून, या क्षणापर्यंत इम्रान खान सरकारने कुठलीही प्रतिक्रिया यावर दिलेली नाही. जी-20 शिखर संमेलन 21 आणि 22 नोव्हेंबर रोजी रियाधमध्ये होणार आहे. जी-20 समिट सौदी अरेबियामध्ये आयोजित होणे ही बाब सौदी अरेबिया सरकार गौरवाची मानत आहे. राजकुमार सलमान स्वत: समिटच्या अध्यक्षस्थानी असतील. ही बाबही येथे मोठी मानली जात आहे. समिटचे एकूणच आयोजन सदैव स्मरणात राहावे म्हणून 24 ऑक्टोबर रोजी सौदी सरकारने 20 रियाल किमतीची एक बँक नोट (चलनी नोट) जारी केली. या नोटेत समोरील बाजूला सौदी राजे राजकुमार सलमान बिन अब्दुल अजीझ यांचे छायाचित्र आहे आणि एक स्लोगनही त्याखाली नमूद आहे. मागील बाजूला जगाचा नकाशा आहे. त्यात जी-20 देश नानाविध रंगांत दाखविले गेले आहेत. पाकिस्तानच्या नकाशातून व्याप्त काश्मीरसह गिलगिट आणि बाल्टिस्तान हे भाग वगळण्यात आले आहेत.
चीन-पाकिस्तान-तुर्कस्तान
‘युरेशियन टाईम्स’च्या या वृत्तानुसार, पॅलेस्टाईन आणि काश्मीरबाबत पाकिस्तानचे धोरण समान आहे; पण सौदी अरेबिया आणि इस्रायलचे भारताशी जवळचे संबंध आहेत. राजकुमार सलमान यांनी आपले परराष्ट्र धोरणही बदललेले आहे. राजकुमार सलमान यांच्यालेखी भारताचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, तर पाकिस्तान त्यांच्या (सलमान यांच्या) खिजगणतीतही नाही.
पाक दिवाळखोरीच्या वाटेवर असताना ऑगस्टमध्ये कर्जफेड करावी म्हणून पाकच्या मागे सौदीने तगादा लावला होता.काश्मीरमध्ये 370 कलम रद्द केले तेव्हाही सौदी सरकारने भारताविरुद्ध कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. उर्वरित अरब देशांनीही असेच केले. इम्रान एकटेच भारताविरुद्ध गळा फाडत राहिले. पाकिस्तान म्हणूनच चीन आणि तुर्कस्तानच्या गोटात जाऊन बसला आहे.