
भालाफेकचा विचार केला तर नीरज चोप्राचे नाव सर्वांच्या ओठावर येते. पण आता नीरज चोप्राचा एक मोठा विक्रम एकाच वेळी मोडणारा हा नेवासा तालुक्यातील सोनई परिसरातील गणेशवाडी येथील तरुण खेळाडू चर्चेत आला आहे. गोल्डन बॉय म्हणून ओळख असणाऱ्या नीरज चोप्राचे अनेक बेस्ट रेकॉर्ड आहेत. पण आता सोशल मीडियावर एका नव्या खेळाडूची जोरदार चर्चा रंगली आहे. अवघ्या 20 वर्षांच्या शिवम लोहकरेने असा पराक्रम केला आहे की, खुद्द ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रालाही आश्चर्य वाटलं.
गणेशवाडी (ता. नेवासा) येथील शिवम सतीश लोहकरे याने भारतीय सैन्य दलातर्फ आयोजित बंगळुरू येथे आयोजित ७४ व्या इंटर सर्व्हिस अॅथलेटिक्समध्ये ८४.३१ मीटर भालाफेक करून सुवर्णपदक पटकावले. त्याने २०२० मधील टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भारतीय खेळाडू नीरज चोप्रा याचे ८३.८० मीटर भालाफेकाचाही रेकॉर्ड मोडला. शिवमसाठी मोठा क्षण तो होता जेव्हा नीरज चोप्राने त्याला इंस्टाग्रामवर शुभेच्छा दिल्या. “बधाई हो शिवम, वेरी गुड, असंच पुढे जात राहा,” असं नीरजने लिहिलं. त्यावर शिवमने मनापासून उत्तर दिलं, “यँक यू सो मच भैया.
“शिवम लोहकरे हा 80 मीटरच्या पलीकडे भाला फेकणारा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात तरुण भारतीय ठरला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राने हे यश केवळ 18 व्या वर्षी मिळवलं होतं. शिवम सलग चौथ्यांदा 80 मीटरचा टप्पा ओलांडत असल्याने त्याचा आत्मविश्वासही उंचावला आहे. शिवम आता भारताच्या जेव्हलिन थ्रोच्या नव्या पिढीचा चेहरा बनतोय. त्याच्या या यशामुळे भारतीय अॅथलेटिक्समध्ये नव्या आशेची ज्योत पेटली आहे.