नवी दिल्लीः एका दुर्दैवी घटनेत दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबातील किमान 5 जणांचा मंगळवारी सकाळी बिहारच्या लखीसराय जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 333 वर झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, सुशांत सिंगचे कुटुंब ज्या वाहनातून प्रवास करत होते, ते वाहन ट्रकला धडकल्यानंतर हा अपघात झाला. वृत्तानुसार, गीता देवी यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहून ते पाटणाहून परतत होते. गीता देवी या हरियाणाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी ओपी सिंग यांची बहीण आहेत, जी सुशांत सिंग राजपूतची मेहुणी आहे.
या घटनेची खातरजमा करताना लखीसरायचे पोलीस अधीक्षक (SP) सुशील कुमार यांनी खुलासा केलाय. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमो (SUV) मध्ये दहा जण प्रवास करत होते, त्यांची ट्रकला धडक बसली. “सुमोच्या चालकासह सहा जण जागीच ठार झालेl, तर चार जखमींना गंभीर अवस्थेत रुग्णालयात हलवण्यात आलेय,” असेही त्यांनी सांगितले.
जखमी बालमुकुंद सिंग आणि दिल खुश सिंग यांना उपचारासाठी पाटणा येथे पाठवण्यात आल्याची खातरजमा पोलिसांनी केली. उर्वरित दोन, बाल्मिकी सिंग आणि टोनू सिंग यांना लखीसराय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेय, तर मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलेत.
रिपोर्टनुसार, लालजित सिंग (ओपी सिंग यांचा मेहुणा), त्यांची दोन मुले अमित शेखर, राम चंद्र सिंग, बेबी देवी, अनिता देवी आणि ड्रायव्हर प्रीतम कुमार यांचा अपघातात मृत्यू झालाय. सुशांत सिंग राजपूत गेल्या वर्षी 14 जून रोजी त्याच्या वांद्रे फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आला होता, ज्यामुळे त्याचे मित्र, कुटुंब आणि चाहत्यांना धक्का बसला होता. 28 जुलै रोजी बिहारमधील अभिनेता रिया चक्रवर्ती विरुद्ध राजपूतचे वडील केके सिंग यांनी प्रथम माहिती अहवाल (FIR) दाखल केल्यानंतर ईडीने गेल्या वर्षी 31 जुलै रोजी दिवंगत अभिनेत्याच्या मृत्यू प्रकरणात अंमलबजावणी प्रकरण माहिती अहवाल नोंदविला होता.