सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल शरद पवार यांचं मोठं विधान.. म्हणाले..
मुंबई : महा24न्यूज
खासदार सुप्रिया सुळे या राज्यात सक्रिय होतील आणि महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री बनतील अशी चर्चा अनेकदा होत असते. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमातही भाजपचे आमदार आशीष शेलार यांनी या विषयावर मत व्यक्त केले होते. मात्र सुप्रिया सुळे या अनेक राष्ट्रीय पातळीवरील विषयांवर काम करत आहेत. त्यामुळे त्यांना राज्यातील राजकारणात रस नसल्याचे खुद्द राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
‘दैनिक लोकमत’ ला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतची शक्यता फेटाळून लावली आहे. काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या पुस्तकाचे शरद पवार यांच्या हस्ते आणि भाजप आमदार आशीष शेलार यांच्या उपस्थितीत प्रकाशन झाले. या कार्यक्रमात आशीष शेलार यांनी शरद पवार यांच्यासमोरच महाराष्ट्रात मराठा स्त्री मुख्यमंत्री व्हावी अशी अपेक्षा बोलून दाखवली होती. त्यानंतर राज्याच्या राजकारणात सुप्रिया सुळे सक्रिय होतील आणि त्याच पहिल्या महिला मुख्यमंत्री बनतील अशा चर्चा सुरू झाल्या. आता मात्र शरद पवार यांनी केलेल्या विधानामुळे या चर्चांना विराम लागला आहे.
सुप्रिया सुळे यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू करतानाच राष्ट्रीय पातळीवरील विषय निवडले. आजपर्यंत त्यांनी अनेक विषयांमध्ये काम केले असून त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. प्रत्येकाचा एक विशिष्ट क्षेत्रात काम करण्याचा कल असतो. त्याचप्रमाणे सुप्रिया सुळे यांचा कल राज्याच्या राजकारणात नसून केंद्र पातळीवरील विषयांमध्ये असल्याचे शरद पवार यांनी या मुलाखतीत सांगितले.





