मुंबई : काँग्रेस नेते आणि लोकसभा खासदार शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी दिल्ली कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री शशी थरुर यांना न्यायालयाचा मोठा दिलासा मिळाला आहे. थरुर यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणात शशी थरूर यांच्यावर आरोप निश्चित केले जावेत की नाही या प्रश्नावर निर्णय देताना न्यायालयाने हा निर्णय दिला. न्यायालयाने शशी थरूर यांच्यावर आरोप निश्चित करण्यास नकार दिला. पोलिसांनी पोलिसांवर कलम 306 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि कलम 498 (क्रूरता) चे आरोप केले होते.
हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळल्या होत्या सुनंदा पुष्कर
17 जानेवारी 2014 च्या रात्री सुनंदा पुष्कर दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळल्या. त्यांच्या मृत्यूनंतर शशी थरूर यांच्यावर मानसिक छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता. शशी थरूर हे या प्रकरणातील मुख्य आरोपी होते आणि दिल्ली पोलिसांनी त्यांच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
सुनंदाचा मृत्यू विषाने झाल्याचा अहवाल
29 सप्टेंबर 2014 रोजी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी एम्स वैद्यकीय मंडळाने मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल दिल्ली पोलिसांना सुपूर्द केला. सुनंदाचा मृत्यू विषाने झाल्याचे या अहवालात म्हटले होते. बोर्डाने म्हटले होते की, अशी अनेक रसायने आहेत, जी पोटात गेल्यानंतर किंवा रक्तात गेल्यानंतर विष बनतात.
पाकिस्तानी पत्रकाराचे नावही आले
सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांचेही नाव समोर आले. 2014 मध्येच सुनंदा पुष्करने मेहर तरारवर शशी थरूर यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याचा आरोप केला आणि त्या दोघांचे अनेक वैयक्तिक ट्वीट केले. यानंतर ट्विटरवरच दोघांमध्ये जोरदार वाद झाला.





