सुटी सिगारेट व बिडी विकायला राज्यात बंदी! ठाकरे सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
अहमदनगर :- राज्यात आता कुठेही पान बिडी दुकानात अथवा राज्यात कुठेही सुटी सिगारेट व बिडी विकायला बंदी घालण्यात आली आहे. यापुढे सिगरेट व बिडी ओढायचीच असेल तर संपूर्ण पाकिट आणि बिडी बंडल विकत घ्यावे लागणार आहे.
कोरोनाच्या पार्शवभूमीवर राज्यातील ठाकरे सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील तरुणाई मोठ्या संख्येने या व्यसनाकडे वळत असल्याने सरकारकडून हा आदेश जारी करण्यात आला आहे. महाविद्यालयीन तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात सिगारेटच्या व्यसनाकडे वळत असल्याचे निदर्शनास आले होते.
परंतु, एक किंवा दोन अशा सुट्या स्वरुपात सिगारेट उपलब्ध झाल्या नाहीत तर तरुणाई तितक्या प्रमाणात व्यसनाच्या अधीन जाणार नाही, असा आरोग्य विभागाचा अंदाज आहे.
यापूर्वी राज्य सरकारकडून शाळा आणि महाविद्यालयाच्या 100 मीटर परिसरात सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती.






