‘सीबीआय’नंतर राज्यात ‘ईडी’लाही ‘नो एंट्री’?; गृहमंत्र्याचं सूचक वक्तव्य
महाविकास आघाडीतील नेत्यांना ई़डीच्या नोटीसा येत आहेत. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे आणि शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीटी नोटीस आली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संताप व्यक्त करत सूचक असं वक्तव्य केलं आहे.
महाराष्ट्रात सीबीआयला कोणत्याही प्रकरणाचा तपास करायचा असेल तर राज्य सरकारची परवानगी घेणं बंधनकारक आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि भाजपचे नेतेमंडळी ‘ईडी’ला हाताशी घेऊन सूडाचं राजकारण करत असल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
‘ईडी’च्या आडून भाजप सुडाचं राजकारण करत आहे. याआधी केंद्र सरकारच्या धोरणांबाबत बोलल्यावर सीबीआय चौकशी होत होती आता ईडीच्या नोटीसा येत असल्याचं देशमुख म्हणाले.
दरम्यान, सीबीआयला महाराष्ट्रात तपास करायचा असेल तर राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते तसाच निर्णय ईडीबाबतही घेण्याती गरज असल्याची मागणी मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.




